मोठी बातमी! पंकजा मुंडेंच्या पीएच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल, कुटुंबातील या लोकांवरही गुन्हा…

मुंबई : भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने मुंबईतील घरात काल (शनिवारी, ता. २२) टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा ७ फेब्रुवारी रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर अवघ्या दहा महिन्यात त्यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

अनंत गर्जे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा दावा गौरी यांनी केला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गौरी आणि अनंत यांच्यामध्ये सतत भांडणे होत होती. अखेर या सगळ्याला कंटाळून गौरीने काल स्वत:ला संपवले. आता या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौरीच्या आत्महत्येनंतर तिच्या वडिलांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गौरीला आत्महेत्येपूर्वी अनंत गर्जेच्या आधीच्या पत्नी किरणच्या गर्भवती असल्याची कागदपत्र मिळाल्याने ती अस्वस्थ होती. ती कागदपत्रे तिने आम्हाला पाठवली होती असा गौरीच्या वडिलांचा जबाब आहे.
वडिलांच्या जबाबानंतर डॉक्टर गौरी गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी पती, नणंद आणि दीरावर गुन्हा दाखल. गौरी गर्जेला मारहाण करून मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे देखील तक्रारीमध्ये सांगण्यात आले आहे.
अनंत भगवान गर्जे, शीतल आंधळे, दीर अजय भगवान गर्जे हे माझ्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार आहेत. अनंत गर्जे हा गौरीने आत्महत्या केली असं सांगत असला तरी ही आत्महत्या आहे की घातपात आहे याची चौकशी व्हावी. वरील तीन लोकांविरोधात माझी तक्रार आहे, असे गौरीच्या वडिलांनी पोलिसांना स्टेटमेंट दिले आहे.
त्यानंतर गौरीचा पती अनंत गर्जे, नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरळी पोलीस ठाण्यात तिघांवर बीएनएस कलम १०८,८५, ३५२,३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल. गौरीला सासराच्या मंडळींकडून क्रुरतेची वागणूक देणे (८५) तसेच धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
