शरद पवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा!! भाजप आमदाराची मोठी मागणी, नेमकं प्रकरण काय?


मुंबई : शरद पवार हे कारस्थानाचा कारखाना आहेत. कारस्थान कसे रचायचे, हे शरद पवारांकडे पाहून शिकता येईल. मारकडवाडी प्रकरणात त्यांनी देशाच्या निवडणूक आयोगावर शंका निर्माण करण्याचे काम केले आहे.

ज्या शरद पवारांनी दिशाभूल करून निवडणूक आयोगासारख्या विश्वासार्ह संस्थेवर शंका निर्माण करायला लावले, त्यांच्यावर निवडणूक आयोगाची बदनामी केली म्हणून गुन्हा निर्माण केला पाहिजे. निवडणूक हा देशाचा गाभा आहे, त्यावर षडयंत्र करून शंका घेण्यास भाग पाडणे म्हणजे देशद्रोह आहे.

त्यामुळे शरद पवारांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला पाहिजे, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. ते बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

पडळकर म्हणाले की, शरद पवार हे कारस्थान रचण्यात पारंगत आहेत. “मारकडवाडी प्रकरणात पवारांनी देशाच्या निवडणूक आयोगावर शंका निर्माण करण्याचे काम केले. निवडणूक आयोगासारख्या संस्थेची बदनामी करणे म्हणजे थेट देशाच्या लोकशाहीवर आघात आहे,” असे ते म्हणाले.

याचबरोबर पवारांना आधुनिक काळातील नारदमुनी, असे संबोधत पडळकर पुढे म्हणाले की, एकीकडे पवार मंडल यात्रा काढतात, तर दुसरीकडे त्यांचा नातू मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतो. ही दुतोंडी भूमिका लोकांना दिशाभूल करणारी आहे.

पडळकर यांनी राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांचा उल्लेख करताना म्हटले की, “जर जयंत पाटलांनी आत्महत्या केली तर मला एक नंबरचा आरोपी करा. त्यांनी पवारांवर आरोप करताना म्हटले की, सहकार क्षेत्रात पवारांचे प्राबल्य आहे. पण जर या क्षेत्रात ईव्हीएम यंत्रणा आली तर हे प्राबल्य संपणार आहे. म्हणूनच पवार लोकांमध्ये शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत दोन लोकांनी त्यांना १६० आमदार जिंकवून देण्याची ऑफर दिल्याचा दावा केला होता. यावर पडळकर म्हणाले की, हे षडयंत्र पवारांनी तात्काळ गृहमंत्र्यांना सांगायला हवे होते. पण त्यांनी हे राहुल गांधींना सांगितले. पोलिसांऐवजी राहुल गांधींकडे जाणं म्हणजे षडयंत्र नाही का?” असा सवालही त्यांनी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!