महिला कुस्तीपटू विनेश फोगाटचं कमबॅक ;निवृत्तीचा निर्णय अखेर मागे, २०२८ मध्ये ऑलिम्पिकमध्ये खेळणार

पुणे : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने गेल्या काही दिवसांपूर्वी कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र आता ती पुन्हा एकदा मैदानात सज्ज झाली आहे.विनेश फोगाटने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही अपडेट शेअर केली आहे. पोस्टमध्ये तिने म्हटलंय की, तिचं लक्ष आता लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या २०२८ मधील ऑलिम्पिक खेळावर आहे.
विनेश फोगाटने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने म्हटलंय की, लोक मला अनेकदा विचारतात. त्यांची शेवटची पॅरिस ट्रीप शेवटची होती का? माझ्याकडे याचं उत्तर नव्हते. मला मॅट, अपेक्षा आणि स्वप्नांपासून दूर जायचे होते. इतक्या वर्षातून मी पहिल्यांदा सुटकेचा निःश्वास सोडला. माझे काम, जीवनातील चढ-उतार, त्याग आणि माझे पैलू समजून घेण्यासाठी वेळ लागला. मला अजूनही खेळ आवडतो. मला अजूनही स्पर्धा करायची आहे.
शांततेने मला खूप काही शिकवले, आग कधीच विझत नाही. फक्त थकवा आणि आवाजाखाली दबले गेले होते. शिस्त, दिनचर्या आणि स्पर्धा हे माझ्या शरीरात आहे. मी कितीही दूर गेले तर माझा एक भाग हा मॅटवर असतो. त्यामुळे मी येथे आहे. आता मी LA28 च्या दिशेने परत पाऊल टाकत आहे. यावेळी मी एकटी नव्हे तर माझा मुलगादेखील संघात सामील होत आहे, असं तिने पोस्टमध्ये लिहलं आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकण्याचे विनेश फोगाटचे स्वप्न होते. मात्र, तिचे स्वप्न अर्धवट राहिले. परंतु आता विनेश फोगाटने पुन्हा एकदा जिद्दीने कमबॅक केलं आहे. ती पुढच्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाली आहे.

