दहशतीचा दरारा ; आंदेकर कुटुंबाची धक्कादायक मालमत्ता समोर, तब्बल 18 कोटी मालमत्ता अन 22 गुंठे जागा, कोथरूड-नानापेठेतही प्लॉट

पुणे : नाना पेठेतील टोळीयुद्ध आणि कौटुंबिक वादातून आयुष कोमकर याचा खून झाला. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर व त्याच्या कुटुंबीयांची १८ कोटी रुपयांची मालमत्ता आणि 22 गुंठे जागा यासोबत कोथरूड नाना पेठेतफ्लॅट असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आंदेकर टोळीच्या मालमत्तेच्या तपासणीत आतापर्यंत १७ कोटी ९८ लाख ९३ हजार रुपयांची मालमत्ता निष्पन्न झाली. बंडू आंदेकरची फुरसुंगीत २४.५ गुंठे जागा, कोथरूडमध्ये फ्लॅट, दोन दुकाने, तीन मजली घर, नाना पेठेत फ्लॅट, लोहियानगरमध्ये दोन खोल्या, हडपसरमध्ये एक खोली; तसेच वृंदावणी वाडेकर हिच्याकडे तीन मजली राहते घर, एक टपरी, साईनाथ झोपडपट्टी, हडपसर येथे खोली आणि शिवम आंदेकरच्या नावे मुळशीतील अगळांबे गावात २२ गुंठे जागा, कोथरूड व नाना पेठेत फ्लॅट व दुकान आणि शिवराज आंदेकर याचा नाना पेठेत फ्लॅट व सोनाली आंदेकरकडे नाना पेठेत दोन दुकाने अशी मालमत्ता आहे. त्यासोबतच १६ विकसन करारनामेदेखील समोर आले असून, नातेवाइक व हितसंबंधितांच्या नावे असलेल्या मालमत्तेबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान आंदेकर टोळीचा विश्वासू मोहन गाडेकर याने सीसीटीव्हीचे फुटेज डिलिट केल्याचे समोर आले आहे. त्यालाही पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात आता आणखीन काही माहिती समोर येते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
