कारचे नियंत्रण सुटल्याने पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एकजण जागीच ठार, अंगावर काटा आणणारी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद..

पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर संतवाडी फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने समोरून धडक दिल्यामुळे दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी आहे. संध्याकाळी सव्वासहा वाजता ही घटना घडली आहे.
सुरेश भाऊ जेडगुले (वय. ५८) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, अनिल मारुती निमसे (वय. ५२) हे गंभीर जखमी झाले आहेत. अनिल निमसे हे निमसेमळा, आळे तालुका जुन्नरचे रहिवासी आहेत, तर जेडगुले आळेच्या रामवाडीमध्ये राहत होते.
सुरेश यांचा भाऊ रमेश भाऊ जेडगुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक डॉ. गणेश अरुण वाकचौरे यांच्याविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, अनिल निमसे आणि सुरेश जेडगुले रस्त्याच्या कडेने संतवाडी फाटा येथे संध्याकाळी सव्वासहाच्या दरम्यान दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणारे डॉक्टर गणेश वाकचौरे यांचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगाने येणाऱ्या या कारने दुचाकीला जोरात धडक दिली.
दरम्यान, डॉक्टर वाकचौरे यांच्या गाडीचा स्पीड इतका प्रचंड होता की दुचाकीवर मागे बसलेली व्यक्ती हवेत उडून रस्त्यावर आपटली. तर दुसऱ्या व्यक्तीला कारने काही अंतरापर्यंत फरफटत नेलं.
या संपूर्ण अपघाताचा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या अपघातामध्ये सुरेश जेडगुले यांचा मृत्यू झाला, तर अनिल निमसे गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचा अधिक तपास पोलीस करत आहेत.