लोणीकाळभोरला सराईत गुन्हेगारांनी शेतकऱ्याला लुटले, दोन सराईतांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!!
लोणी काळभोर : मित्रास भेटण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्याची गाडी फोडून भररस्त्यात लुटल्याचा धक्कादायक प्रकार लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील बाजारमळा परिसरातुन समोर आला आहे. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोन जण फरार आहेत.
राजेश बाळासाहेब काळभोर ( वय-३१, रा. बाजारमळा, लोणीकाळभोर, ता. हवेली ) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ऋषिकेश पवार व गौरव सोनवणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. या गुन्ह्यात आणखीन दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश काळभोर यांच्या वडिलापार्जित शेती व्यवसाय आहे. शेती व्यवसायावर त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरु आहे. काळभोर हे त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी व्हेरना गाडीत बुधवारी (ता. १७) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास निघाले होते. बाजारमळ्याकडून लोणी गावाकडे जात असताना ओढ्याच्या अलीकडे अचानक गाडीच्या पाठीमागील काचेवर दगड मारल्याचा आवाज आला होता.
त्यानंतर काळभोर यांनी गाडी थांबवली. त्यांनी गाडीच्या खाली उतरून पाहिले असता, बुलेट मोटारसायकलवरती दोघेजण दिसून आले. तसेच त्यांच्या पाठीमागून स्प्लेंडर मोटारसायकलवरून आणखी दोघेजण आले होते. बुलेट गाडीवर ऋषिकेश पवार व गौरव सोनावणे होते. या दोघांनी मिळून राजेश काळभोर यांना पकडले आणि पैसे दे, नाहीतर तुला जीवे मारून टाकतो अशी धमकी दिली होती. त्यामुळे काळभोर यांच्या खिशातील ऋषिकेश पवार याने तीन हजार काढून घेतले व त्यांच्या गाडीच्या चारही बाजूच्या काचांवर दगड मारून त्या फोडल्या. त्यानंतर चौघेजण दोन मोटारसायकलवरून पळून गेले. याप्रकरणी राजेश काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दरम्यान, सदर गुन्ह्यातील आरोपी ऋषिकेश पवार हा तडीपार गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहे. त्यामुळे सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलिसांनी त्वरित आरोपी ऋषिकेश व गौरव सोनवणे यांना अटक केली आहे. तर या गुन्ह्यातील अजून दोन अनोळखी आरोपींची नाव समोर आलेले नाही. त्या अनुषंगाने पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहे.