ऊस वाहतूक करताना शेतकऱ्यांचे मोठं नुकसान, ट्रॅक्टरमधून उसाच्या मोळ्या रोडवर, छत्रपती कारखाना परिसरातील प्रकार…

भवानीनगर : राज्यात सध्या ऊस गळीत हंगाम सुरू असून सर्व कारखाने जास्तीत जास्त गाळप करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे असताना शेतकऱ्यांचे ऊस वाहतूक करताना नुकसान होत असल्याचे फोटो सध्या समोर आले आहेत. यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात सध्या ऊस वाहतूक करताना उसाच्या मोळ्या ट्रक ट्रॅक्टर चालकांकडून रोडवर पडत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे उसाच्या वजनात घट होत असून याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
यामुळे ऊस वाहतूक करताना काळजी घेण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना परिसरात सध्या वाहतूकदारांकडून अशा प्रकारची चूक होत आहे. या ठिकाणी रोडवर अनेकदा उसाच्या मोळ्या पडलेल्या दिसत आहेत यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.

यामुळे वजनात घट होत असून याकडे कारखाना प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी येथील शेतकरी तुषार निंबाळकर तसेच दर्शन भुजंगे यांनी ही बाब लक्षात आणून दिली. तसेच याकडे लक्ष देण्याची मागणी केली.
या प्रकारामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून कारखाना परिसरात अनेक ठिकाणी अनेक रोडवर अशा प्रकारच्या उसाच्या मोळ्या दिसून येत आहेत. तसेच यामुळे ऊस कुठेही पडला असल्याने अपघाताचा देखील धोका आहे. यामुळे कारखाना प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.