पुरंदर विमानतळाच्या शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला 20 नोव्हेंबरपासून मिळणार…

पुणे : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन मोजणीचे काम वेगाने सुरू असून सध्या उदाचीवाडी, एखतपूर आणि मुंजवडी या तीन गावांची मोजणी पूर्ण झाली असून, कुंभारवळण, खानवडी, वनपुरी आणि पारगाव या उर्वरित गावांची मोजणी १६ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार आहे.
तसेच मोजणी पूर्ण झाल्यावर सात गावांतील शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या आणि परताव्याबाबत निर्णय घेतले जाईल. २० नोव्हेंबरपासून खरेदीखत करून शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
विमानतळासाठी ७ गावांमधील ३,००० एकर जमीन संपादित केली जाणार आहे. आतापर्यंत ३,२२० शेतकऱ्यांनी २,८१० एकर जमिनीसाठी संमतीपत्रे दिली असून, ९५ टक्के क्षेत्राची संमती मिळाली आहे. २६ सप्टेंबरपासून मोजणीला सुरुवात झाली.
कुंभारवळण आणि खानवडी गावांची मोजणी दोन दिवसांत पूर्ण होईल, तर वनपुरी आणि पारगाव येथील मोजणी अनुक्रमे ११ आणि १३ ऑक्टोबरपासून सुरू होईल. मोजणी प्रक्रियेत महसूल, भूमी अभिलेख, कृषी, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे आणि एमआयडीसीचे अधिकारी सहभागी आहेत. जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, शेतकरी सहकार्य करत असून, कोणतेही वाद न होता मोजणी सुरू आहे.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप संमतीपत्रे दिली नाहीत, त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना विकसित भूखंड दिले जाणार आहेत. भूसंपादन प्रक्रिया थेट जिल्हाधिकारी कार्यालयातून राबविली जाईल. भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन शेतजमीन खरेदीसाठी शेतकरी असल्याचे दाखले दिले जाणार आहेत. असे जिल्हाधिकारी म्हणाले आहे.