सरकारकडून केलेल्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्च स्थगित…!
मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी विधानसभेवर नाशिक ते मुंबई पायी लॉन्ग मार्च काढला होता. यानंतर हा लॉन्ग मार्च मुंबईच्या वेशीवर पोहचला आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर शेतक-यांचा लाँग मार्च स्थगित करण्यात आला आहे. शेतकरी नेते जे. पी. गावित यांनी ही माहिती दिली आहे.
गेल्या सात दिवसांपासून शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. या लाँग मार्चमध्ये पुरुष शेतक-यांप्रमाणे महिला शेतकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.
पुंडलिक जाधव या ५५ वर्षीय शेतक-याचा काल मृत्यू झाला. या मृत्यूनंतर त्यांच्या गावाक-यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आमच्या मागण्या अगोदरच मान्य केल्या असत्या आणि त्याची अंमलबजावणी केली असती तर ही वेळ आली नसती, अशा भावना शेतक-यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच आमच्या शेतकरी बांधवाचा मृत्यू झाला, त्याला शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी देखील मागणी पुंडलिक जाधव यांच्या गावक-यांनी केली आहे.
दरम्यान शेतक-यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी दाखल होणार आहेत. तसेच शेतक-यांना नाशिकला सोडण्यासाठी बसेस आणि दोन रेल्वेची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
कांद्याला हमीभाव, कर्जमाफी, अवकाळीमुळे झालेले नुकसान अशा अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्रातल्या शेतक-यांनी लाँग मार्चची वाट धरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतक-यांना ३०० रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा केली आहे, तसेच बैठकीच्या फे-याही झाल्या आहेत. मात्र तरीही शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम होते. परंतु आता हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
सध्या दहा गाड्या आंदोलनस्थळी दाखल झाल्या आहेत. शेतकरी माघार घेतील तेव्हा याच गाड्यांतून आम्ही त्यांना नाशिकला सोडणार आहोत, अशी प्रतिक्रिया कल्याण -डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या कर्मचा-यांनी दिली आहे.