शेतकऱ्यांनो तयारीला लागा! पुढील ४८ तासात मॉन्सून राज्याच्या बहुतांश भागांत पोचणार

पुणे : सध्या राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे. पुढील ४८ तासात मॉन्सून राज्याच्या बहुतांश भागांत पोचणार असा अंदाज ‘आयएमडी’ ने व्यक्त केला आहे.

असे असताना पुण्यात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी उशिरापर्यंत हलक्या ते मध्यम सरी कोसळत होत्या. उत्तर कोकण, म. महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत मॉन्सून दाखल झाला आहे.
यामुळे येणाऱ्या काळात पाऊस वाढत जाणार आहे. यंदा पाऊस उशिरा दाखल झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मॉन्सूनची उत्तरसीमा अलिबाग, सोलापूर, उदगीर, नागपूर, बक्सर, सिध्दार्थनगर, बीजनोर, यमुनानगर, द्रास येथून जात आहे.

पुणे आणि आसपासच्या परिसरात मात्र, पावसाने हुलकावणी दिली होती. यामुळे पाऊस कधी सुरू होणार या प्रतिक्षेत सर्वजण होते. शनिवारी सकाळ पासून पुण्यात ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळाला.
काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी ऊन होते. सकाळी सात नंतर पुण्यातील कात्रज, कोंढवा, मुंढवा, बिबवेवाडी, धायरी फाटा, वारजे, शिवणे, हिंगणे अशा अनेक ठिकाणी पाऊस पडला.