सामान्य शेतकऱ्याची लेक झाली कृषी अधिकारी ! दौंड तालुक्यातील स्नेहल थेऊरकर हिने वडीलांचे स्वप्न पूर्ण…!

उरुळी कांचन : राजपत्रित अधिकारी होण्याचं ध्येय बाळगून, आई-वडील, कुटूंबियाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत व कष्टाच्या बळावर खामगाव (ता.दौंड ) येथील एका सामान्य शेतकरी कुटूंबातील मुलीने कृषी अधिकारी या पदावर गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे कुटूंबात कोणीही उच्च शिक्षित नसतानाही स्वतः हाच भविष्य घडण्यासाठी केलेल्या या प्रयत्नांचे यशात रुपांतरीत करण्याची कामगिरी या मुलीने केल्याने या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्नेहल संजय थेऊरकर असे कृषी अधिकारी पदावर नियुक्ती झालेल्या मुलीचे नाव आहे. शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित अधिकारी म्हणून झालेल्या कृषी अधिकारी पदाच्या भरतीत पूर्व परिक्षा , मुख्य परिक्षा व मुलाखतीत विशेष प्राविण्यासह तिने गुण संपादीत तिची निवड झाली आहे. तिने यापूर्वी १०१८ साली कृषी सेवक भरती प्रक्रियेत निवड होऊन ३ वर्षे तिने कासुर्डी व भरतगाव या ठिकाणी कृषी खात्यात तिने नोकरी सांभाळली आहे. नोकरी करताना एमपीएससीच्या कृषी अधिकारी भरतीत तिने सर्व पातळीवर यश मिळवित यश संपादीत केले आहे.
स्नेहल थेऊरकर ने प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा खामगाव येथे पूर्ण केले तर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल , खामगाव येथे पूर्ण करुन महाविद्यालयीन शिक्षण महर्षी शिक्षण संस्था, पुणे व कृषी अभ्यासक्रमात बीएस्सी ऍग्री रत्नाई कृषी महाविद्यालय , अकलूज व एमएससी शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी येथे पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या भरती प्रक्रियेत कृषी सेवक व आता कृषी अधिकारी पदावर यश प्राप्त केले आहे. तसेच ती ऐवढ्यावरच न थांबता एमपीएससी चा अभ्यासक्रम चालू ठेवत तिची आणखी शासकीय वर्ग अधिकारी १ म्हणून तिचे प्रयत्न सुरू आहेत.
खामगाव येथील सामान्य शेतकरी कुटूंबातील मुलीने हे यश संपादीत केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. गावकऱ्यांसाठी मोठा अभिमानाची बाब असल्याने या कर्तबगार लेकिची गावातून मिरवणूक काढली आहे. स्नेहल थेऊरकर ने हे यश तिचे वडील संजय थेऊरकर यांच्या प्रेरणेने पूर्ण करु शकल्याचे म्हटले आहे. या यशात आते बहीण अर्चना आखाडे, बहिण सोरतापवाडी ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया चौधरी यांच्या मार्गदर्शनाने मिळाल्याचे अभिमानाने सांगत आहे.