लोणी काळभोर येथे रेल्वेच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू, घटनेने हळहळ…

लोणी काळभोर : पुणे – दौंड लोहमार्गावरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना मालगाडीने धडक दिल्याने एका शेतकरीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात गुरुवारी (ता.१०) रोजी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

राहुल नामदेव काळभोर (वय ४०, रा. रायवाडी, लोणी काळभोर, ता.हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल काळभोर हे कुटुंबासोबत रायवाडी परिसरात राहतात. कामानिमित्त ते रेल्वेच्या पलीकडे चालले होते. पुणे-दौंड रेल्वे लाईन क्रॉस करत करताना दौंड कडून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या एका मालगाडीने त्यांना जोरदार धडक दिली.

राहुल काळभोर यांच्या दोन्ही पायांवरून गाडी गेल्याने ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती युवराज काळभोर यांना कळताच त्यांनी त्वरित लोणी काळभोर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल रूपाली कदम व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून जखमी राहुल काळभोर यांना विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र काळभोर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी घोषित केले. राहुल काळभोर यांनी आत्महत्या केली असावी. असा प्राथमिक अंदाज मिळत आहे. मात्र शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण पुढे येईल. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.