मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा मृत्यू

पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील पुणे लेनवर कोन गावाजवळ अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. यामध्ये प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असफिया बानो मोहम्मद फरीद खान (वय 22, रायबरेली, उत्तर प्रदेश) हिचा मृत्यू झाला आहे. तर तिच्यासोबत प्रवास करणारे चार सहकारी गंभीर जखमी झाले आहेत.
पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, टोयोटा अर्बन क्रुझर कार क्रमांक UP 32 MU 2287चा चालक नूर आलम खान (वय 34) याने निष्काळजीपणे व वेगाने वाहन चालवले. अचानक नियंत्रण सुटल्याने कारने 3 ते 4 वेळा पलटी घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. अपघात एवढा जबर होता की, कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
असफिया खान ही सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा होती. इंस्टाग्राम वर तिचे अडीच लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. लखनऊ तील या तरुणीने अल्पवधीतच सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग निर्माण केला. अचानक झालेल्या तिच्या निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.