प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन, पुण्यात घेतला अखेरचा श्वास..

पुणे : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आणि तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. गौतमी पाटील हिच्या वडिलांचे निधन झाले आहे. गौतमी पाटील ही तिच्या वडिलांपासून वेगळी रहात होती.
काही दिवसांपूर्वी गौतमीचे वडील रवींद्र पाटील हे धुळ्यात बेवारस अवस्थेत सापडले होते. त्यानंतर गौतमीने त्यांच्यावर पुण्यात उपचार करणार असल्याचे सांगितले होते.
अखेर आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पुण्यातील चिंतामणी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धनकवडी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आई आणि वडील पूर्वीच वेगळे झाल्याने गौतमी आईसोबत राहाते. जेव्हा गौतमी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली तेव्हा तिचे वडीलदेखील माध्यमांमध्ये झळकले होते. मात्र मागच्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.
धुळ्यातील दुर्गेश चव्हाण यांना रवींद्र पाटील हे बेवारसपणे पडलेले आढळून आले होते. सुरुवातीला ते कोण आहेत, याची त्यांना जाणीव नव्हती. त्यांनी रविंद्र पाटील यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
त्यांच्या खिशातील आधार कार्डमुळे त्याचे नाव कळाले. चव्हाण यांनी सोशल मीडियात त्यांच्याबद्दल माहिती टाकली. त्यानंतर ते गौतमीचे वडील असल्याचे लक्षात आले.