ग्राहकांना दिलासा! सणांच्या तोंडावर सोने-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या नवीन दर..
पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहेत. आज सोन्याच्या दरात घसरण झाली असून तुम्हीपण लग्नासाठी सोन्या-चांदीचे दागिने घेण्याचा विचार करत असाल, तर आज तुम्हाला स्वस्त दरात सोने खरेदीची संधी आहे.
शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५९ हजारांच्या खाली आला. तर चांदी प्रति किलो ७० हजार रुपयांवर आली आहे. गेल्या सोमवारी शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५८,९६९ रुपयांवर होता. त्यात आज घट होऊन तो ५८,८४३ रुपयांवर आला.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५८,८४३ रुपये, २३ कॅरेट ५८,६०७ रुपये, २२ कॅरेट ५३,९०० रुपये, १८ कॅरेट ४४,१३२ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३४,४२३ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर प्रति किलो ७०,१६० रुपयांवर खुला झाला आहे. गेल्या सोमवारी चांदीचा दर प्रति किलो ७०,२११ रुपये होता.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा दर ५ महिन्यांच्या निच्चांकावर गेला आहे. COMEX सोन्याचा भाव प्रति औंस १,९०२ डॉलरपर्यंत खाली आला आहे.
दरम्यान, एमसीएक्सवर सोन्याचा दर ५९ हजारांच्या खाली आला आहे. ११ जुलैनंतर पहिल्यांदाच सोन्याचा दर ५९ हजारांच्या खाली आला आहे. MCX वर चांदीचा दर ७० हजारांच्या खाली आला आहे.
सोन्या-चांदीच्या किमती कशा ठरवल्या जातात?
भारतातील सोन्या-चांदीची किंमत फ्युचर्स मार्केटच्या ट्रेडिंगनुसार दररोज ठरवली जाते. ट्रेडिंग दिवसाचा शेवटचा बंद भाव हा पुढील दिवसाचा बाजारभाव मानला जातो.
मात्र, हे केंद्रीय प्राइस असते आणि यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये इतर काही शुल्कासह दर निश्चित केला जातो आणि त्यानंतर किरकोळ विक्रेते दागिन्यांमध्ये मेकिंग चार्ज लावून त्याची विक्री करतात.