फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? सीआयडी आहे तर तपासाला वेळ का लागत आहे? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो

बीड: जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. देशमुख यांना अभिवादन करुन कुटुंबीयांना धीर देण्यासाठी मराठा आंदोलक जरांगे पाटील मस्साजोगमध्ये गेले होते. यावेळी देशमुख यांच्या आईने जरांगे पाटील यांच्यासमोर हंबरडा फोडला. फडणवीस साहेब सांगा आई आणि लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा. आम्हाला न्याय कधी मिळणार? असं म्हणत संतोष देशमुखांच्या आईला अश्रू अनावर झाले.

यावेळी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या आईने हंबरडा फोडत फडणवीस साहेब सांगा आईने भावाने लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा. सून घेऊन बसले लेकरं इकडे तिकडे पाठवले आता मी करायचं काय? असा सवाल देखील संतोष देशमुख यांच्या आईने केला. सीआयडी आहे म्हणतेत मग तपास का होत नाही. तुम्हाला वेळ का लागतो? का आम्हालाच काहीतरी करायचे असे सरकारने ठरवलंय का? असे प्रश्न उपस्थित केले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, आम्हाला सरकारने उत्तर द्यावं. लेकरं कुठेतरी ठेवलेत याचं सरकारने काहीतरी बघावं लागेल. धनु सोबत कोणीतरी पाहिजे आणि आम्हाला देखील पोलीस संरक्षण पाहिजे, अशी मागणी देखील संतोष देशमुख यांच्या आईने केली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाले असून आज मस्साजोग येथे काळा दिवस पाळला जाणार आहे. इतकच नाही तर प्रत्येक वर्षी 9 डिसेंबर हा काळा दिवस म्हणून असेल. त्याचबरोबर सरपंच देशमुख हत्या प्रकरणावर विधानसभेत निवेदन दिले जावे, अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे.
ते म्हणाले,आमचा निष्पाप माणुस गेला आहे. त्यामुळे आज मस्साजोगमध्ये काळा दिवस पाळण्यात येणार आहे. आज गुन्हेगारांचा जाहीर निषेध गावकऱ्यांकडून केला जाणार आहे. 9 डिसेंबर मस्साजोगसाठी कायमचा काळा दिवस असेल, असं आज आम्ही जाहीर करणार असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे.