मोठी बातमी! ७५ लाखांचं खंडणी प्रकरण, विद्यमान आमदाराला विमानतळावरच ठोकल्या बेड्या, उडाली खळबळ..


राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका विद्यमान आमदाराला पोलिसांनी विमानतळावरून अटक केली आहे. सध्या संबंधित आमदाराची कसून चौकशी केली जात आहे. प्राथमिक चौकशीनंतर संबंधित आमदाराला कोर्टात हजर केलं जाणार आहे.

पडी कौशिक रेड्डी असे अटक केलेल्या आमदाराचे नाव आहे. ते बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समितीचे विद्यमान आमदार आहेत. शनिवारी तेलंगणा पोलिसांनी खंडणीच्या आरोपाखाली ही अटक केली.

वारंगल सुभेदारी पोलिसांनी हुजुराबाद येथील आमदाराला हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतलं. यानंतर त्यांना चौकशीसाठी वारंगलला घेऊन गेले आहे.

ग्रेनाइट खाणीच्या मालकाच्या तक्रारीवरून कौशिक रेड्डी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बीआरएस नेत्याने त्यांना धमकावले आणि ५० लाख रुपयांची खंडणी मागितली, असा त्यांच्यावर आरोप आहे.

दरम्यान, कमलापूर मंडळाच्या वनगपल्ली येथे खाण चालवणारे मनोज रेड्डी यांनी त्यांच्या पत्नी रमादेवी यांच्यामार्फत ही तक्रार दाखल केली. ग्रेनाइट खाणींवरील जनतेच्या रोषाचे कारण देत आमदाराने २५ लाख रुपये खंडणी घेतली. यानंतर ५० लाख रुपयांची मागणी करत आहेत, असं तक्रारीत म्हटलं आहे.

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर कौशिक रेड्डी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला नाही. सोमवारी त्यांची याचिका फेटाळून लावली. आमदाराने व्यावसायिकाला केलेल्या धमकीच्या फोनबद्दल सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर पुरावे सादर केले. यावर आमदारांच्या वकिलांकडून युक्तीवाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना सबळ पुरावे सादर करता आले नाहीत. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!