पुणेकरांच्या सोयीकरीता रेल्वेने घेतला मोठा निर्णय ; विभागामध्ये १५ स्टेशनवर ५० एक्स्प्रेस गाड्यांना मिळणार थांबा…!

पुणे : पुणे रेल्वे विभागातून धावणाऱ्या ५० गाड्यांना १५ रेल्वे स्टेशनवर नव्याने थांबे देण्यात येणार आहेत. त्यासाठी पुणे विभागातून रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार असून, रेल्वेची प्रवासी संख्या वाढण्यास मदत होणार आहे.

पुणे विभागातील तळेगाव, हडपसर, साताराबरोबरच महत्त्वाच्या १५ स्टेशनवर ५० एक्स्प्रेस गाड्यांना काही वेळ थांबा दिला जाणार आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार असून, रेल्वेची प्रवासी संख्या वाढण्यास मदत होणार आहे.
पुणे रेल्वे विभागात दिवसाला अडीचशेपेक्षा जास्त गाड्या धावतात. त्यामध्ये एक्स्प्रेस, लोकल गाड्यांचा समावेश आहे. पुणे विभागातून धावणाऱ्या मेल, एक्स्प्रेसला खूपच कमी थांबे आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर अशा महत्त्वाच्या थांब्यांवर मेल, एक्स्प्रेस थांबतात. त्यामुळे प्रवाशांना गाडी पकडण्यासाठी याच स्टेशनवर जावे लागते.

दरम्यान, पुणे-मिरज दरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे क्रॉसिंगसाठी गाड्यांना लागणारा ४० ते ४५ मिनिटांचा वेळ कमी झाला आहे. त्यामुळे या वेळेचा वापर प्रवाशांच्या सोयीसाठी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.