पुण्यात ईव्हीएममध्ये बिघाड? तीन मतदानानंतर चौथ्या मतदानाला… शरद पवार गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

पुणे : तब्बल ९ वर्षानंतर होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांसाठी पुणेकर आज मतदान करत आहेत. पुणे शहरात 41 प्रभागातून 165 नगरसेवक निवडण्यासाठी मतदान होणार आहे. आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून ईव्हीएममध्ये बिघाड झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या बिघाडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनीही ईव्हीएमच्या कार्यप्रणालीवर आक्षेप नोंदवला आहे.

पुणे महापालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. मतदान करताना ईव्हीएम मशीनचा बिघाड झाला आहे. यावर बोलताना शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले,प्रत्येकवेळी बटण दाबल्यानंतर लाईट लागते मात्र तीन मतदान केल्यानंतर चौथा मतदान झालं तेव्हा लाईट लागला नाही, त्यामुळे मतदान योग्य पद्धतीने झाले नाही.


तसेच ईव्हीएम मशीनमध्ये दाखवत असलेली वेळ ही सात वाजून 44 मिनिट म्हणजे 14 मिनिट जास्त दाखवत आहे असा आरोपही अंकुश काकडे यांनी केला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित असून निवडणूक प्रशासन या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे. आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर नागरिकांनी मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे उद्या या मतदानाचा निकाल स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या महापालिकांवर सत्ता कोणाची असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.
