दिशा सालियन प्रकरणात हायकोर्टात खळबळजनक युक्तिवाद! राणेंचं नाव, ठाकरे गटाचा ‘राजकीय खेळी’चा आरोप; निकाल राखून


मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात खळबळ उडवली आहे. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या महत्त्वपूर्ण सुनावणीत आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी याचिकेमागे राजकीय हेतू असल्याचा दावा करत राणे कुटुंबीयांसह काही व्यक्तींच्या नावांचा उल्लेख केला. दुसरीकडे, सरकारी पक्षाने या प्रकरणात कोणताही गुन्हा घडल्याचे पुरावे नसल्याचा दावा करत याचिका फेटाळण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत दिशावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गुन्हा नोंदवून नव्याने तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

सुनावणीदरम्यान आदित्य ठाकरे यांच्या वतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील सुदीप पासबोला यांनी ही याचिका तथ्यांपेक्षा राजकीय वैरातून पुढे आणण्यात आल्याचा दावा केला. युक्तिवाद करताना त्यांनी राणे कुटुंबीय आणि राष्ट्रीय माध्यमातील अर्णब गोस्वामी यांच्या नावाचा उल्लेख केला. मात्र, दिशा सालियनच्या वडिलांबद्दल पूर्ण सहानुभूती असून त्यांना या प्रकरणात योग्य तो निष्कर्ष मिळायला हवा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

दुसरीकडे सरकारी वकील शिशिर हिरे यांनी याचिका फेटाळण्याची मागणी करत वैद्यकीय अहवालात लैंगिक अत्याचाराचे पुरावे समोर आले नसल्याचे न्यायालयाला सांगितले. दिशासोबत राहत असलेल्या रोहित रॉयचा जबाबही तपासात महत्त्वाचा असल्याचे नमूद करण्यात आले. दिशाच्या मानसिक स्थितीबाबत त्याने माहिती दिल्याचा दावा सरकारी पक्षाने केला.

मागील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. आवश्यक वाटल्यास एफआयआर नोंदवून पुढील तपास करता येऊ शकतो, असे निरीक्षणही न्यायालयाने केले होते. त्याचवेळी या प्रकरणाकडे राजकीय आरोपांच्या चौकटीत नव्हे, तर मुलगी गमावलेल्या एका वडिलांच्या वेदनेच्या दृष्टीने पाहत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

सुनावणीदरम्यान सतीश सालियन यांचे यापूर्वी नोंदवलेले जबाबही न्यायालयासमोर मांडण्यात आले. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या जबाबात पूर्वी कोणताही संशय व्यक्त करण्यात आला नव्हता. आता सुनावणी पूर्ण झाल्याने दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देते आणि पुढील तपासाबाबत कोणते निर्देश देते, याकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!