अभियांत्रिकेचा टॉपर निघाला ‘चोर’ ; पुण्यात दागिने चोरून कर्नाटकमध्ये पळून गेलेल्या तरुणाला अटक

पुणे : अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना टॉपर राहिलेल्या तरुणांनेच बुधवार पेठेतील सराफी पेढीतून पावणेपाच लाख रुपयांची फॉर्मिंग ज्वेलरी चोरली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा तरुण ज्वेलरी चोरून कर्नाटकमध्ये पळून गेला.अखेर या तरुणाला विश्रामबाग पोलिसांनी चार दिवसांच्या तपासानंतर अटक केली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चोरी करणारा तरुण कोणताही सराईत गुन्हेगार नसून, अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना ‘टॉपर’ राहिलेला विद्यार्थी आहे. तो (वय १९) मूळचा कर्नाटकातील कोलार येथील अरनहल्ली गावातील आहे. त्याने सहा जुलैला मध्यरात्री एकच्या सुमारास, दुकानाच्या वॉशरूमच्या खिडकीतून प्रवेश करून फॉर्मिंग ज्वेलरी लंपास केली. दुसऱ्या दिवशी दुकानमालकाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेश उसगावकर यांच्या तपास पथकाने २३० ते २५० ‘सीसीटीव्ही’ फुटेज तपासून आरोपीचा मागोवा घेऊन आरोपीला अटक केली.
दरम्यान चौकशीदरम्यान तरुणाने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता १९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
