बारामतीत लगीनघाई! युगेंद्र पवार आज लग्नबंधनात अडकणार, अजित पवार पुतण्याच्या विवाहाला हजेरी लावणार? मोठी अपडेट समोर

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबाचे स्थान नेहमीच महत्त्वपूर्ण राहिले आहे. राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक कार्यक्रमांच्या वेळी पवार कुटुंबीय एकत्र आल्याचे दिसून आले आहे. आज 30 नोव्हेंबर रोजी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांचा विवाह होत आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी आज लग्नबंधनात अडकणार आहेत. मात्र, या विवाह सोहळ्याला अजित पवार उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता वाढली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी आज लग्न बंधनात अडकणार आहेत.पवारांचा विवाह सोहळा सायंकाळी 5.15 वाजता होणार आहे. या विवाह सोहळ्याच्या पूर्वसंध्येला जय पवार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी उपस्थिती लावली आहे. तसेच हळदी समारंभाचे काही फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले असून, त्या युगेंद्र पवारांना हळद लावताना दिसत आहेत. दुसरीकडे आमदार रोहित पवार आज दिवसभर जामखेडमध्ये प्रचार दौरा करणार असल्याने तेही विवाहाला उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र, त्यांनी काल हळदी समारंभाला मात्र हजेरी लावली होती.आज विवाहाच्या दिवशी अजित पवार यांचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवसभर प्रचार दौरे आधीपासून ठरलेले आहेत.सकाळी 10 वाजता अजित पवार भोर येथील सभेसह आपल्या प्रचार दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. त्यानंतर दौंड, इंदापूर, माळेगाव आणि बारामती या ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत. बारामतीतील सभा सायंकाळी साडेसहाला होणार आहे. या विवाह सोहळ्यालाअजित पवार उपस्थित राहणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पवार कुटुंबाला राज्याच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शरद पवारांनी आखून दिलेल्या वाटेवर सुप्रिया सुळे आणि अजित पवार आजही राजकारणाची परंपरा पुढे नेत आहेत. राजकीय मतभेद असूनही पवार कुटुंबीय अनेकदा एकत्र येताना दिसतात. मात्र, युगेंद्र पवार यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बारामतीतून अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निडवणुकीत अजित पवार यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता.

दुसरीकडे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अजित पवार हे या निवडणुकीत प्रचार करत आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुतण्या युगेंद्र पवार यांच्या लग्नाच्या वेळी उपस्थित नसतील, अशी माहिती मिळत आहे. मात्र, रात्री उशिरा ते विवाहस्थळी येऊ शकतील, अशी शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. आता अजित पवार युगेंद्र पवारांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

