वाहतूक कोंडीला रामराम? पुण्यात आणखी एक डबल डेकर उड्डाणपूल; मेट्रो विस्तारालाही गती…

पुणे : पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी आणखी एका दुमजली उड्डाणपुलाला मंजुरी देण्यात आली आहे. मुंढवा, केशवनगर ते खराडी बायपास मार्गावरील महात्मा फुले चौक येथे हा डबल डेकर उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने या दुमजली उड्डाणपुलाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. या प्रकल्पासाठी अंदाजे 126 कोटी 63 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
या उड्डाणपुलाची रचना दुहेरी स्तराची असेल. खालच्या स्तरावरून वाहनांची वाहतूक सुरू राहील, तर वरच्या स्तरावरून मेट्रो धावणार आहे. भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन हा प्रकल्प आखण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विकासकामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याने, पावसाळ्याचा कालावधी वगळता सुमारे 24 महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, पुणेकरांकडून मेट्रो सेवेला मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेता मेट्रोच्या विस्तारित मार्गिकांनाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार मुंढवा, केशवनगर ते खराडी या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. महामेट्रोशी समन्वय साधून या उड्डाणपुलाच्या आराखड्यात मेट्रो मार्गाचाही समावेश करण्यात आल्याची माहिती प्रकल्प विभागप्रमुख दिनकर गोजारे यांनी दिली.
नळस्टॉप येथील उड्डाणपुलाच्या धर्तीवर हा एकात्मिक डबल डेकर उड्डाणपूल उभारला जाणार आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक आणि मेट्रो यांचा समन्वय साधून शहरातील वाहतूक अधिक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
दरम्यान, हडपसर येथील काळेबोराटेनगर परिसरातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे-मिरज रेल्वे मार्गावर पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग उभारण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 5 कोटी 37 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
या भागात रेल्वे गेट वारंवार बंद ठेवावे लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत होती. त्यामुळे नागरिकांकडून सुरक्षित पर्यायाची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार रेल्वे विभागामार्फत येथे पादचारी भुयारी मार्ग उभारण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे.