एलॉन मस्क यांची टेस्ला भारतीय ग्राहकांना पैसे करतीये परत, काय आहे कंपनीचा प्लॅन? जाणून घ्या..

नवी दिल्ली : एलॉन मस्क यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. ईव्ही कंपनी टेस्लाने भारतात मॉडेल ३ कार बुक केलेल्या ग्राहकांना पैसे परत करण्यास सुरुवात केली आहे.
एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे. या अहवालानुसार, काही ई-मेलही मिळाले आहेत ज्यातून ही माहिती मिळाली आहे. टेस्ला लवकरच भारतात आपल्या कार विकू शकते. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ऑटोमोबाईल बाजार आहे.
टेस्ला बऱ्याच काळापासून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडेच कंपनीने भारतात स्वतःची टीम तयार केली आहे. कंपनीने २०१६ मध्ये मॉडेल ३ बुक केलेल्या ग्राहकांना एक ई-मेल पाठवला आहे. त्यात ‘कंपनी सध्या तुमची बुकिंग रक्कम परत करत आहे.
जेव्हा आम्ही भारतात आमच्या गाड्या विकण्यास तयार असू, तेव्हा आम्ही तुमच्याशी पुन्हा संपर्क साधू. आम्हाला आशा आहे की जेव्हा आम्ही भारतात गाड्या लाँच करू आणि त्या तुम्हाला देऊ, तेव्हा तुम्ही पुन्हा बुक कराल’, असे म्हटले आहे.
दरम्यान, टेस्ला जुन्या मॉडेल 3 मॉडेल्सचे उत्पादन बंद करत आहे, म्हणून कंपनी बुकिंगचे पैसे परत करत असल्याचे समोर आले आहे. टेस्लाने पाठवलेल्या ई-मेलवरून असे दिसून येते की, कंपनी भारतात कार विकू इच्छिते. टेस्ला गेल्या अनेक वर्षांपासून भारत सरकारशी कारवरील कर कमी करण्यासाठी बोलत आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार होणार आहे. या करारात कारवरील कर कमी करण्याबाबतही चर्चा होऊ शकते.