धर्म नाही… कर्म बघूनच दहशतवाद्यांचा खात्मा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला थेट निर्वाणीचा इशारा, म्हणाले..


नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर हे केवळ एका मोहिमेचे नाव नसून तो आमचा निर्धार आहे. हा असा निर्धार आहे ज्यात केवळ आम्ही डिफेन्स करत नाही, तर गरज पडल्यावर आम्ही कठोर निर्णय घेतो आणि कठोर कारवाई देखील करतो.

दहशतवादाविरोधात भारताची प्रतिज्ञा किती कठोर आहे, ते सगळ्या जगाने पाहिलं. आम्ही त्यांच्या न्यूक्लियर ब्लॅकमेलची पर्वा केली नाही. पाकिस्तानने अनेकदा अणवस्त्र वापरण्याच्या धमक्या दिल्या.

आज मी श्रीनगरच्या भूमीवरुन सगळ्या जगाला प्रश्न विचारतो, अशा बेजबाबदार, चुकीच्या देशाच्या हातात अणवस्त्र सुरक्षित आहेत का?. पाकिस्तानची अणवस्त्र IAEA च्या आपल्या देखरेखीखाली घ्यावी” अशी मोठी मागणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली. ते जम्मू-काश्मीरमध्ये बोलत होते.

       

ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी सैन्यदलांना धूळ चारणाऱ्या भारतीय जवानांच त्यांनी भरभरुन कौतुक केलं. आमचं सैन्य मातृभूमीच्या रक्षणासाठी न थांबता काम करतय हे अद्वितीय आहे असं राजनाथ सिंह म्हणाले.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन निरपराधांना मारलं. तुम्ही जे उत्तर दिलं, ते जगाने बघितलं. भारतीयांना तुम्ही धर्म विचारुन मारलत, तर आम्ही तुम्हाला तुमचं कर्म पाहून मारलं. त्यांनी धर्म पाहून निरपराधांचा बळी घेतला. आम्ही पाकिस्तानच कर्म पाहून त्यांचा खात्मा केला. हा आमचा भारतीय धर्म आहे” असं राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितलं आहे.

ऑपरेशन सिंदूर’ हे प्रत्येक जवानाच्या डोळ्यांमध्ये दिसणारे स्वप्न होतं. दहशतवाद्यांच्या प्रत्येक ठिकाणांवर हल्ला करून शत्रूंची छाती चिरत, दहशतवादांची तळ उध्वस्त करूनच माघारी फिरु, असेचं साऱ्यांचे स्वप्न होतं. माझ्या माहितीप्रमाणे ऑपरेशन सिंदूर हे आतापर्यंतच्या दहशतवादी विरोधी कारवाईतील सर्वात मोठी मोहीम होती.

आज भारतीय सैन्याने संपूर्ण जगाला हा संदेश दिला आहे की, आतंकवादाच्या विरोधात भारतीय सैन्य कुठल्याही स्तराला जाऊ शकतं. आमच्या माथ्यावर त्यांनी वार केला, आम्ही त्यांची छाती फोडली आहे. विश्वासघाताची जबर किंमत पाकिस्तानी मोजली आहे आणि इथून पुढे देखील हे असं सुरू राहिलं तर त्याला देखील आमचे चोख उत्तर राहील.

आता संपूर्ण जगाला माहिती झालंय की आमच्या सैन्याचा निशाणा हा अचूक आहे. ज्यावेळी ते निशाणा लावतात त्यावेळी हल्ल्याची मोजदाद करण्याची जबाबदारी शत्रूंवर सोडली जाते. असे म्हणत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी थेट पाकिस्तानला निर्वाणीचा ईशारा दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!