‘नेहमीच येतो उन्हाळा’ म्हणत वळती उपकेंद्रावर वीजेची बोंब सुरूच! ६० वर्षाच्या जुन्या वाहिनीवरच वीजेचा लपंडाव सुरू; पूर्व हवेलीतील वळती फिडरमुळे उन्हाळ्यात नागरीक बेहाल…

जयदिप जाधव

उरुळीकांचन: मुळशी महावितरणच्या विभागाअंतर्गत उरुळीकांचन उपविभागात ‘नेहमीच येतो उन्हाळा’ या परंपरेनुसार यंदाच्या वर्षी उन्हाळा आला असून आलेला उन्हाळा हा पुन्हा विजेच्या लपंडाव खेळाने सुरू झाला असून कार्यालयाअंतर्गत नेहमीची समस्या असलेल्या वळती उपकेंद्रावरील अतिरिक्त वीजेच्या कमतरतेने प्रवाह खंडीत होत असून या उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच वीजेचा खेळखंडोबा झाल्याने शेतकरी, नर्सरी व्यवसायिक ,व्यावसायिक ग्राहक त्रस्त झाले आहेत.
पूर्व हवेली तालुक्यातील उरुळीकांचन उपविभागातील वळती उपकेंद्रावरील वाहिनीवर वीजेची अतिरिक्त मागणी कडक उन्हाळी वातावरणाने वाढल्याने वीज वाहिनी खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. या वाहिनीवर थेऊर ,कुंजीरवाडी, सोरतापवाडी , तरडे ,वळती व उरुळीकांचन या वाढत्या नागरीकरणासह शेती , नर्सरी उद्योग व व्यावसायिक वीजेची मागणी असताना वीजेचा पुरवठा उन्हाळ्याच्या झळांनी अतिरिक्त वीजेच्या मागणीमुळे खंडीत होत असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागताच नागरीक संतप्त झाले आहेत.

वळती उपकेंद्रावर चालू स्थितीत वीजेचा भारच कंडक्टर वाहू न शकल्याने कंडक्टर तुटून वीज गायब होण्याचा प्रकाराने ग्राहक संतप्त आहेत.या भागातील मुळा -मुठा कालव्यावर अवलंबून असलेला शेती व्यवसाय, नर्सरी व्यवसाय विजेचा खेळखंडोबामुळे त्रस्त झाले आहेत. या भागात शोभिवंत रोपांची निर्मिती करणारा नर्सरी व्यवसाय या खंडीत पुरवठ्याने अर्थिक अडचणीत आला असून वीजेअभावी शोभिवंत झाडे जळून जाण्याचा मोठा धोका उद्भवला आहे.
नर्सरी उद्योगासह शेतीचे अतोनात नुकसान या खंडीत प्रवाहाने होत असून व्यावसायिक ग्राहकाचे मोठे नुकसान अटळ आहे.
वळतीउपकेंद्र बोरीऐंदीला जोडावे…
उरुळीकांचन उपविभागात दौंड तालुक्यातील डाळींब व बोरीभडक या दोन गावांचा सामावेश आहे. दौंड तालुक्यातील केडगाव व यवत परिसरासाठी बोरीऐंदी येथे नवीन २२ केव्ही उपकेंद्र नव्याने चालू झाले असून हा भाग या उपकेंद्राला जोडावा अशी अत्यावश्यक गरज निर्माण झाली आहे. अन्यथा थेऊरकेंद्रावरून प्रलंबित असलेल्या नवीन वाहिनीचे काम चालू करावे अशी आवश्यकता निर्माण झाली आहे.
‘ थेऊर केंद्रावरून वळतीकडे जाणारी वाहिनीवर अतिरिक्त दाब आहे. या वाहिनीवर अतिरिक्त दाब असल्याने कंडक्टर तुटणे ववाहिनी नादुरुस्त होणे असे प्रकार वारंवार घडत आहे. या वाहिनीवर कायमस्वरुफी अतिरिक्त पुरवठा मिळावा म्हणून बोरीऐंदीचा विचार सुरू आहे. परंतु या ठिकाणी अतिरिक्त मागणी असल्याने या ठिकाणाहून वीज पुरवठा मिळणे कठीण आहे. शेतकऱ्यांनी थेऊर-वळती वाहिनीचे काम बंद पाडल्याने हा पर्याय होऊ शकला नाही” –
-महेश धाडवे, उपकार्यकारी अभियंता , उरुळीकांचन