‘एका जातीवर निवडणूक लढवता येणार नाही’ विधानसभा जिंकण्यासाठी मनोज जरांगेंचा सूर बदलला ; जरांगेंची मतदारसंघ जिंकण्यासाठी आकडेमोड …!
जालना : एका जातीवर निवडणूक लढवता येणार नाही, सर्वांना सोबत घेऊन राजकीय समीकरण जुळवणार, असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं आहे. जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले.
यावेळी पुढे जरांगे म्हणाले, काही मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितल्यानंतर आता एकच उमेदवार दिल्यावाचून पर्याय नाही. प्रत्येकालाच उभं राहायचं आहे. त्यामुळे मी सर्वांना बोलून घेईन. ज्यांनी ऐकले नाही त्यांच्यावर मी नाराज होणार नाही. सर्वांनी 30-40 दिवस कष्ट घेतले तर पाच वर्ष सर्व जनता आनंदी राहणार आहे.
सर्वांना हात जोडून विनंती करतो की एकच जण उभे रहा. किती मतदारसंघ काढायचे हे आज जाहीर करायचे नाही. प्रत्येक मतदारसंघात चार ते पाच जणांनी फॉर्म भरून ठेवायचे आहेत. 29 किंवा 30 तारखेला मतदार संघ जाहीर करू. तेव्हाच उमेदवार ही जाहीर करू. चिन्ह आल्याशिवाय उपयोग नाही असेही मनोज जरांगे म्हणाले.
दरम्यान, विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना मनोज जरांगे हे कोणते राजकीय गणित जुळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.