राज्यात लवकरच निवडणुकांचे धुमशान; निवडणूक आयोगाने बोलावली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक…

मुंबई : राज्यात गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदांपासून अगदी ग्राम पंचायतीपर्यंत सर्वांचाच कारभार हा प्रशासकाच्या माध्यमातून राबवला जात आहे. शिवाय निवडणुकींची तयारी करणाऱ्या अनेकाना केवळ प्रतिक्षाच करावी लागत आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने १० जुलै रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांतील निवडणूकपूर्व तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे.
बैठकीसाठी निवडणुका घेण्यात येणाऱ्या संस्थांची माहिती, मतदारसंख्या, मतदान केंद्रांची माहिती, ईव्हीएम यंत्रांची उपलब्धता, मनुष्यबळ आणि वेळेवर उद्भवणाऱ्या अडचणी याबाबत सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, या निवडणुकांमध्ये राज्यातील ३२ जिल्हा परिषद, ३३६ पंचायत समित्या, २४८ नगरपरिषद, ४२ नगरपंचायती आणि २९ महानगरपालिकांचा समावेश आहे. यामध्ये महानगरपालिका वगळता इतर संस्थांच्या निवडणुकांबाबत अधिकाऱ्यांकडून विभागनिहाय आढावा घेतला जाणार आहे.
राज्य निवडणूक आयुक्त हे स्वतः विभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून तयारीचा तपशील विचारणार आहेत. आयोगाने यासंदर्भात एक अधिकृत परिपत्रक जारी केले असून, माहिती ९ जुलैपर्यंत PDF स्वरूपात आयोगाला ई-मेलद्वारे पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
ही बैठक अतिशय महत्वाची समजली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२५ हाच या बैठकीचा विषय आहे. येत्या १० जुलै रोजी दुपारी१२ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होणार आहे.
या बैठकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकी बाबत निवडणूक आयोगाला काही तरी ठोस करता येणार आहे. या निवडणुकींकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. या निवडणुका कधी जाहीर होतील याकडे सर्वांचे लक्ष आहे. सर्वच पक्षांनी त्याची तयारी सुरू केली आहे.