मोठी बातमी! विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी निवडणूक लवकरच, ‘ही’ नावे चर्चेत..
मुंबई : राजकारण साध्य जोरदार घडामोडी चालू असल्याचे चित्र आहे. तसेच विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या देखरेखीखाली कारभार चालवू नये, या मागणीवर उद्धव ठाकरे गटाच्या सदस्यांसह महाविकास आघाडी आक्रमक आहे.
आता रिक्त असलेल्या सभापतिपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय सत्ताधारी युती घेणार असल्याची माहिती आहे. तसेच सत्ताधारी युतीची परिषदेतील सदस्य संख्या जवळपास ३० वर पोहोचली असल्याने आता अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून येऊ शकतो.
हे रिक्त पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) रामराजे नाईक निंबाळकर यांना द्यायचे की भाजपकडे ठेवायचे याचा निर्णय लवकरच होईल.
रामराजे यांचा अनुभव दांडगा असला तरी त्यांचे जावई राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत. शिवाय भाजपचे संख्याबळ लक्षात घेता हे पद आपल्याकडेच ठेवायला हवे, अशी भूमिका पक्षाकडून मांडली जात असल्याची माहिती आहे.
तर, धनगर समाजातील नेते व माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव या पदासाठी चर्चेत आहे. त्यांना संधी मिळाल्यास ओबीसी मतपेटीला न्याय मिळू शकेल, असे मत व्यक्त केले जात आहे.
मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि भाजप सत्तेत नसताना खंबीर भूमिका बजावत पक्षाला आधार देणारे प्रवीण दरेकर किंवा शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यात उत्तम संबंध असलेले उद्योजक प्रसाद लाड यांचेही नाव चर्चेत आहे.
दरम्यान, मुंबईतून मंत्रिपदासाठी साठमारी होणार असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायम आधार देणा-या या दोन नेत्यांना सभापतिपदाची संधी मिळू शकेल, अशीही चर्चा आहे.