निवडणूक आयोगाचा तब्बल 44 राजकीय पक्षांना दणका ; बजावली कारणे दाखवा नोटीस, काय आहे कारण?

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले असताना आता निवडणूक आयोगाने तब्बल 44 राजकीय पक्षांना दणका दिला आहे.2019 पासून आतापर्यंत लोकसभा, विधानसभा आणि इतर पोटनिवडणुकीत एकही उमेदवार उभा न केल्याने राज्यातील 44 राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या पक्षांमध्ये आम जनता पार्टीसह, अखंड भारतीय आवाज, अखिल भारतीय जनहित पार्टी यांसारख्या पक्षांचा समावेश आहे. या सर्व पक्षांना तातडीने खुलासा करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नशीब आजमावू इच्छिणाऱ्या पक्षांसाठी हा मोठा धक्का ठरु शकतो. हे पक्ष निवडणूक आयोगाच्या नोटिशीवर नेमका काय खुलासा करणार, आणि त्यावर आयोगाची भूमिका काय असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नोटीस पाठवलेल्या राजकीय पक्षांमध्ये आम जनता पार्टी सोबतच अखंड भारतीय आवाज, अखिल भारतीय जनहित पार्टी, अखिल भारतीय लोकाधिकार पार्टी, ऑल इंडिया क्रांतीकारी काँग्रेस, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, भारत जनसंग्राम पार्टी, भारत उदय मिशन, भारतीय परिवर्तन काँग्रेस, भारतीय जनहित काँग्रेस पार्टी आदींसह 44 राजकीय पक्षांचा समावेश आहे.

दरम्यान नोटीस बजावलेल्या या सर्व पक्षांची सुनावणी घेण्यात येणार आहे. या सर्व पक्षांना आपली बाजू मांडण्यासाठी 10 आणि 11 सप्टेंबर 2025 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्यासमोर हजर राहणे आवश्यक आहे. त्यामुळे आयोगाच्या नोटीसीवर हे पक्ष काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिला आहे.

