भाजपला निवडणूक आयोगाचा दणका; मुंबई महापालिकेसाठीच प्रचार गीत नाकारलं,काय आहे कारण?

मुंबई: महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघ्या एका आठवड्याचा कालावधी शिल्लक असताना भाजपला निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे.मुंबई महापालिकेसाठी भाजपने तयार केलेल्या प्रचार गीताला राज्य निवडणूक आयोगाने नाकारल आहे.

राज्य निवडणूक आयोगाने भाजपने मुंबई महापालिकेसाठी तयार केलेल्या प्रचार गीतावर आक्षेप घेतला आहे.या विशेष प्रचार गीतामध्ये भगवा या शब्दाचा वापर करण्यात आला होता. पण निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार, धार्मिक भावना किंवा विशिष्ट रंगांचा राजकीय प्रचारात वापर करण्याबाबत कडक नियमावली आहे. हा शब्दप्रयोग आचारसंहितेच्या निकषांमध्ये बसत नाही, असा ठपका आयोगाकडून ठेवण्यात आला आहे.
सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना राज्य निवडणूक आयोगाने हे गीत अधिकृत प्रचारासाठी वापरता येणार नाही, असे म्हणत स्पष्ट नकार दिला आहे.विशेष म्हणजे, हे प्रचार गीत अत्यंत भव्य स्वरूपात तयार करण्यात आले होते. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या आवाजात हे गीत रेकॉर्ड करण्यात आले होते.

आगामी निवडणूकीसाठीच्या भाजपच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात या गीताच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची भाजपची रणनीती होती. मात्र ऐनवेळी आयोगाच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
यंदा मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरुद्ध भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही बाजूनीं प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.