मला ज्यावेळी सल्ल्याची गरज असते. त्यावेळी मी शरद पवारांना फोन करतो ; एकनाथ शिंदे

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची स्तुती केली. ते म्हणाले पवार साहेब नेहमीच सर्वांना मार्गदर्शन करत असतात. ते अनुभवी नेते आहेत. ज्यांनी गेली अनेक वर्षे राज्यात देशात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या त्यांचे योगदान देखील फार मोठे आहे. कुठला माणूस सत्तेवर बसला आहे हे न पाहता या राज्यात राज्याच्या हितासाठी, भल्यासाठी राज्यातील सर्वसामान्य लोकांना मदत होण्यासाठी ते मार्गदर्शन करतात. मला देखील ते आवश्यकता असेल तेव्हा फोन करतात. सुचना मार्गदर्शन करतात. मी त्यांचा आभारी आहे. सहकार क्षेत्रात शरद पवार यांचे योगदान आहे ते कोणालाही नाकारता येणार नाही, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
‘साखर उद्योगाला शरद पवारांसारख्या अनुभवी माणसाची गरज‘
वस्त्रोद्योगानंतर साखर उद्योगांचा नंबर लागतो. आर्थिक चक्र सक्रिय ठेवण्यात साखर उद्योगांचा मोठा हातभार लागतो. साखर उत्पादनात जगात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे ही अभिमानाची बाब आहे. साखर उद्योग वाढला पाहिजे, टिकला पाहिजे यासाठी सरकार अतिशय गांभीर्याने काम करत आहे. असंख्य शेतकरी या उद्योगावर अवलंबून आहेत म्हणूनच अठरा प्रकल्प राबवत आहोत. या क्षेत्रास शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी माणसाची गरज आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
शरद पवार शेतकऱ्यांच्या पाठिशी, सगळ्यांनी त्यांचे सल्ले ऐकले पाहिजेत : मुख्यमंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच इथेनॉल वापराला प्राधान्य देत आले आहेत. याचा साखर कारखानदारांना फायदा होईल. सहकार क्षेत्रात शरद पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो. तेच शरद पवार सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठिशी आहेत. त्यामुळे सगळ्यांनी त्यांचे सल्ले ऐकले पाहिजेत.
त्यानुसार शेतीत किंवा उद्योगात बदल केले पाहिजे. केंद्रीय कृषीमंत्री असताना शरद पवारांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. शेतकऱ्यांबद्दल त्यांना आत्मियता आहे, त्यांचा गाढा अभ्यास आहे, त्यांनी नेहमी मार्गदर्शन करावं. याचा राज्याला नक्कीच फायदा होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांना भेटून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रासाठी मदत करावी अशी मागणी करतो. त्यांनीही आतापर्यंत चांगली मदत केली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.