Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत, कारणही आलं समोर…

Eknath Shinde : भारतात सर्वत्र केवळ राम मंदिराचीच चर्चा आहे. अयोध्येत (उत्तर प्रदेश) नव्याने बांधल्या जात असलेल्या मंदिरात येत्या २२ जानेवारी (सोमवारी) रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांना रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
सोमवारी दुपारी १२.१५ ते १२.४५ या वेळेत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थिती लावण्यास उत्सुक आहेत. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या म्हणजेच २२ जानेवारी रोजीच्या या सोहळ्याला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ही माहिती ‘एक्स’ वरुन दिली आहे.
अयोध्येमध्ये सोमवारी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच. देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्री रामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स अकांऊटवरुन दिली आहे. Eknath Shinde
दरम्यान, या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध खात्यांचे मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी, कलाकार आणि साधू-संतांसह तब्बल सात हजारांहून अधिकजणांना या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहलीपासून अमिताभ बच्चन यांसारखे अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.