Eknath Shinde : मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कराड दौरा अचानक रद्द, कारण…
Eknath Shinde : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी असून, साताऱ्यातील कराडमध्ये असलेल्या त्यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेण्यासाठी अनेक नेतेमंडळी पोहचले आहे.
यंदा मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराडला न येता त्यांच्या समाधीकडे पाठच फिरवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेण्यासाठी येणार होते. मात्र, मुख्यमंत्री शिंदेंचा कराड दौरा अचानक रद्द झाला असल्याचे समोर येत आहे. प्रकृती ठीक नसल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. त्यामुळे साताऱ्यातील कराडमध्ये त्यांच्या स्मृतिस्थळी दर्शन घेण्यासाठी आज मोठी गर्दी होत असते. तर, आज सकाळपासून अनेक नेतेमंडळी कराडमध्ये दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज कराडमध्ये येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी दर्शन घेण्यासाठी येणार होते. Ekanath Shinde
त्यांचा शासकीय दौरा देखील निश्चित झाला होता. त्यानुसार स्थानिक प्रशासनाकडून तयारी करण्यात आली होती. पण, मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याने आणि त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार हे काल शुक्रवारी रात्रीच कऱ्हाडला मुक्कामी आले. त्यांनी आज शनिवारी सकाळी- सकाळी सात वाजताच काही मोजक्याच कार्यकर्त्यांसमवेत समाधीस्थळ गाठले. त्यांनी जेष्ठ नेते चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करुन सकाळी साडेसात वाजताच ते पुण्यासाठी रवाना झाले.