महायुतीत एकनाथ शिंदे अस्वस्थ; दुसऱ्यांदा रात्री दिल्ली दौरा, नेमकं कारण काय?

पुणे : राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस( अजित पवार गट )पक्षातील नेत्यांमध्ये धुसफूस सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असते. त्यात आता एकनाथ शिंदे हे महायुतीत अस्वस्थ असल्याच बोलले जात आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाण्यापूर्वीच रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहेत. त्यांचा एका आठवड्यातील दुसऱ्यांदा दिल्ली दौरा असणार आहे. त्यामुळे या दौऱ्यामागे काय कारण आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (५ ऑगस्ट)ला रात्री उशिरा दिल्ली दौऱ्याला जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दहा वाजेच्या सुमारास दिल्लीमध्ये पोहोचतील. दिल्लीत उद्या विविध बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच शिवसेना शिंदे गटातील खासदारांसोबत इतर महत्वाच्या बैठकांमध्ये शिंदे सहभागी होणार असल्याची माहिती आहे.या दौऱ्यादरम्यान, एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार का? या भेटीदरम्यान, काय चर्चा होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी त्यांनी रात्री ११ वाजता अमित शहा यांची भेट घेतली होती. यानंतर चर्चेला उधाण आलं होतं. त्यानंतर दुसऱ्यांदा होणाऱ्या या दिल्ली दौऱ्यात ते कोणाचीं भेट घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवार (७ ऑगस्ट) रोजी दिल्ली दौऱ्यावर जात असून, इंडिया आघाडीच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. तसंच ते आपल्या खासदारांसोबत स्वतंत्र बैठक घेणार असून, राहुल गांधींनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनालाही ते गुरुवारी हजेरी लावतील, अशी माहिती समोर आली आहे.