देशातील पसंतीच्या यादीत एकनाथ शिंदें आठव्या स्थानी ; महाराष्ट्रात काही शिंदेंना प्रतिसाद मिळेना…!

मुंबई : शिवसेनेत ऐतिहासिक बंड करत मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांना विचार करायला लावणारा सर्वे पुढे आला आहे. सरकार स्थापन केल्यानंतर राज्यभरात दौरे करून देखील मुख्यमंत्री शिंदे हे नागरिकांच्या पसंतीला उतरताना दिसत नाहीत. नुकतेच समोर आलेल्या सर्व्हेतून हे वास्तव पुढे आलं आहे.
त्यांना सत्तेवर येऊन येत्या ३० जानेवारी रोजी सात महिने पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे-सी व्होटर संस्थेने केलेल्या सर्व्हेत देशातील पहिल्या दहा मुख्यमंत्र्यांंमध्ये एकनाथ शिंदे यांनी स्थान मिळविले आहे. देशातील मुख्यमंत्र्यांमध्ये ते आठव्या स्थानी आहेत. मात्र, स्वतःच्या गृहराज्यात म्हणजे महाराष्ट्रात शिंदे पाहिल्या दहामध्ये स्थान मिळवू शकलेले नाहीत.
शिवसेनेत बंड करून चाळीस आमदारांना घेऊन बाहेर पडणारे एकनाथ शिंदे यांना भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली. वास्तविक भाजपचे राज्यात १०६ आमदार असतानाही भाजपने भविष्याचा विचार करून मुख्यमंत्रीपदाची माळ शिंदेंच्या गळ्यात घातली आहे. मात्र, भाजपच्या अपेक्षा किती पूर्ण झाल्या आहेत, हे आगामी निवडणुकीतच दिसून येईल. मात्र, इंडिया टुडे-सी व्होटर संस्थेने केलेल्या ‘मूड ऑफ न नेशन’ सर्व्हेमध्ये एकनाथ शिंदे यांनी पहिल्या दहामध्ये म्हणजे आठवे स्थान मिळविले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशात सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. त्यांना ३९ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. दुसऱ्या स्थानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २.२ टक्क्यांसह आठव्या स्थानी आहेत. गृहराज्यात कोण सर्वाधिक लोकप्रिय आहे, याचा सर्व्हे करण्यात आला त्यामध्ये मात्र एकनाथ शिंदे हे पहिल्या दहामध्ये स्थान मिळवू शकलेले नाहीत.
इंडिया डुटे-सी वोटरच्या सर्व्हेनुसार भारतातील सर्वाधिक पहिले दहा लोकप्रिय मुख्यमंत्री, राज्य, पक्ष आणि देशभरातील लोकांची पसंती पुढीलप्रमाणे :
१) योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश, भाजप) : ३९ टक्के लोकांची पसंती
२) अरविंद केजरीवाल (दिल्ली, आप) : १६ टक्के लोकांची पसंती
३) ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल, तृणमूल काँग्रेस) : ७ टक्के पसंती
४) एम. के. स्टॅलिन (तामिळनाडू, द्रमूक) : ५ टक्के पसंती
५) नवीन पटनायक (ओडिशा, बीजेडी) : ३ टक्के पसंती
६) हेमंत बिसवा सरमा (आसाम, भाजप) ३ टक्के पसंती
७) शिवराज सिंह चौहान (मध्य प्रदेश भाजप) : २.४ टक्के पसंती
८) एकनाथ शिंदे (महाराष्ट्र, बाळासाहेबांची शिवसेना) : २.२ टक्के पसंती
९) वाय. एस. जगन मोहन रेड्डी (आंध्र प्रदेश, वासएसआर काँग्रेस) : १.६ टक्के पसंती
१०) भूपेश बघेल (छत्तीसगड, काँग्रेस) : १. ६ टक्के पसंती