एकनाथ शिंदे फोडले, अजितदादा फोडले पण मैदान अजून सोप्पे नाही! नवीन सर्व्हेने भाजपचे वाढले टेंशन…
मुंबई : सध्या सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे. भाजपने तर यामध्ये जोरदार आघाडी घेत अनेक नेत्यांना जवळ केले आहे. असे असले तरी भाजपसाठी ही लढाई सोप्पी नाही. आता एक सर्वे समोर आला आहे.
इंडिया टीव्हीने केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी २४ जागा एनडीएला तर २४ जागा नव्या म्हणजेच इंडियाला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे. अर्थात संपूर्ण राज्य एका बाजूला करून देखील सत्तेचा फायदा भाजपला मिळणार नाही असाच नवा सर्वे सांगतो आहे.
त्यामुळेच या नव्या सर्वेमुळे भाजपसह शिंदे गट व अजित पवार गटाच्या चिंता वाढल्या आहेत. इंडिया टीव्ही आणि सी एन एक्स या संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये अजितदादांचा गट सत्तेत जाऊनही लोकसभेत महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच या सर्वेमध्ये अजितदादांच्या गटाचे मतदानाचे प्रमाण देखील खूप कमी राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर पहिले सर्वेक्षण समोर आले असून, यामध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक वीस जागा मिळतील.
यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या तीन जागांचे नुकसान होईल. पण आज जिथे फुटलेल्या शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांचे पाच खासदार आहेत, तिथे ११ खासदारांपर्यंत वाढ होऊ शकते असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे आता मैदान जवळ आले असून लवकरच चित्र स्पष्ट होईल.
महाविकास आघाडीच्या जागा पश्चिम महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे. तर विदर्भात दहा जागांपैकी दोन्ही आघाड्यांना प्रत्येकी पाच जागा मिळतील असे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. आता अजित पवार गटाबरोबर एक खासदार असून आणखी एक त्यामध्ये वाढ होऊ शकते. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.