धक्कादायक! नितीन देसाईंना काम मिळू नये म्हणून सुरू होते प्रयत्न? बड्या अभिनेत्याचा हात असल्याची चर्चा..

मुंबई : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी पहाटे एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यांची ही अकाली एक्झिट अनेकांच्या मनाला चटका लावून गेली होती.
नितीन देसाई यांच्या आत्महत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर मोठी खळबळ उडाली. इतक्या मोठ्या कलाकाराने असं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत मात्र विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. या दरम्यान एक वेगळीच चर्चा होताना दिसते आहे.
नितीन देसाई यांचं सर्वात मोठं स्वप्न असलेल्या कर्जत याठिकाणच्या एनडी स्टुडिओमध्ये कोणी काम देऊ नका असे फर्मान बॉलिवूडमधील एका दिग्गज कलाकाराने काढले होते, अशी चर्चा मोठ्या सांस्कृतिक वर्तुळात काम करणाऱ्या मंडळींमध्ये आहे. यामुळेच एनडी स्टुडिओत काम येत नव्हते, असे बोलले जाते आहे.
सांस्कृतिक खात्यात काम केलेल्या ज्येष्ठ मंडळींमध्ये देसाईंना झालेल्या विरोधाची चर्चा आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. आपल्या स्टुडिओत काम येत नसल्याची खंत अनेकदा देसाईंनी काही जणांकडे बोलून दाखवली होती.
त्यांच्याकडे कामे येऊ नयेत यासाठी बॉलिवूडमधील एक मोठी लॉबी त्यांच्या विरोधात कार्यरत होती अशीही चर्चा आता रंगली आहे. अशातच आता एका मोठ्या बॉलिवूडमधील कलाकाराचे नाव काहीजण खाजगीत सांगत आहेत. त्यांच्या ND स्टुडिओत कामं येऊ नये, यासाठी बॉलिवूडमधील एक लॉबी नेमकी कोणत्या कारणामुळे काम करत होती, याचे कारण मात्र अद्याप समजलेले नाही.
नितीन देसाई हे ज्येष्ठ कला दिग्दर्शक होते त्यांनी आजवर अनेक भव्य कार्यक्रम मोठ्या दिमाखात आणि रुबाबात हाताळले आहेत. देसाई यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेले सेट पाहण्यासाठीही मोठी गर्दी होत असते.
देसाई यांच्या नवनवीन संकल्पना, त्यांच्यातला उत्कृष्ट कलाकार आणि त्यांना मिळत असलेली प्रसिद्धी यामुळेच तर त्यांच्या स्टुडिओमध्ये कामे जाण्यास एक लॉबी विरोध करत नव्हती ना असाही आता प्रश्न उपस्थित झाला आहे.
देसाई यांनी इतके मोठे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस तपासात नेमके कोणते सत्य बाहेर येईल याकडे सर्वांचं लक्ष आहे.