Education News : कोचिंग क्लासेस उद्योगासाठी मार्गदर्शक तत्त्वे कशासाठी? विद्यार्थी दबावाखाली, जबाबदार कोण?

Education News : केंद्र सरकारने कोचिंग क्लासेस उद्योगासाठी जाहीर केलेली मार्गदर्शक तत्त्वे सध्या चर्चेत आली आहेत. खाजगी शिकवण्यांचा प्रवास आता महाकाय कोचिंग क्लासेसच्या देशभर फोफावलेल्या उद्योगापर्यंत येऊन पोहोचला आहे. आता विद्यार्थी लहान असतानाच त्याला कोणत्या कोचिंग क्लासमध्ये घालायचे याचा निर्णय पालकांनी घेतलेला असतो.

मुलाच्या कोचिंगसाठी वेगळ्या शहरात घर घेऊन नवरा-बायको वेगळे राहायलाही तयार असतात. घराचा सगळा खर्च सोसायला तयार असतात व प्रसंगी स्वत:ची रोजीरोटीही डावावर लावायला तयार असतात. पण त्याच्या मागे हात धुवूनच लागलेले असतात.
मूळ मुद्दा हा की, हे एवढे प्रचंड मानसिक स्थित्यंतर का घडले? खाजगी कोचिंग क्लासेसमधील आर्थिक लूट, सततच्या तणावाने व स्पर्धेच्या दबावाने त्यांना येणारे नैराश्य या समस्यांसह विद्यार्थ्यांना व पालकांना जास्तीत जास्त संख्येने आपल्याकडेच खेचण्यासाठी कोचिंग क्लासेसवाल्यांकडून होणारा जाहिरातींचा भडिमार, हे वास्तव आहे. Education News

या उद्योगातल्या प्रचंड मोठ्या अर्थकारणाने समाजातील अपप्रवृत्तींना या क्षेत्राने आकर्षित केले आहे. या अपप्रवृत्तींचा या उद्योगात शिरकाव झाला आहे. यामुळे अनेक विद्यार्थी आत्महत्या देखील करत आहेत.
सरकारच्या या चाप लावण्याच्या प्रयत्नांमुळे आणखी काही नव्या समाज घटकांना कमाईच्या ‘नवीन संधीच’ उपलब्ध होण्याची शक्यता जास्त आहे. लक्षणांवर उपचार करताना सरकारने अगोदर मूळ रोग दूर करण्याच्या उपायांकडे लक्ष द्यायला हवे होते.
शिक्षण क्षेत्राला हा रोग जडण्याचे कारण सरकारचे आजवरचे शैक्षणिक धोरण आहे. या देशात शिक्षण क्षेत्रावर देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ २.९ टक्के रक्कम खर्च केली जाते व हा खर्चही सरकारमध्ये बसलेल्यांना आतबट्ट्याचा खर्च वाटतो. हे खूपच खेदजनक आहे.