ईडीची मोठी कारवाई ;बारामतीसह पुण्यात एकाच वेळी छापेमारी,कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस


पुणे: सक्तवसुली संचालयाने मागील काही काळात कोट्यवधींचे घोटाळे उघडकीस आणले आहेत. अशातच आता गुंतवणुकीशी संबंधित प्रकरणात आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज मोठी कारवाई केली. ईडीने आज बारामतीमधील ३ ठिकाणी आणि पुण्यातील दोन ठिकाणी एकाच वेळी छापा मारल्याची माहिती समोर आली आहे.

दुग्ध क्षेत्रातील गुंतवणुकीवर उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 10 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीने आज मोठी कारवाई केली. ही कारवाई विद्यानंद धायरी आणि आनंद लोखंडे या दोघांशी संबंधित चौकशीचा भाग म्हणून करण्यात आली. हा संपूर्ण घोटाळा एका दाम्पत्याद्वारे रचला गेल्याचे समोर आले आहे.

पुणे आणि मुंबईतील अनेक व्यावसायिकांना त्यांनी दुग्ध उद्योगात प्रचंड नफा देण्याचे आश्वासन दिले. गुंतवणुकीवर ‘आकर्षक परतावा’ मिळेल या नावाखाली तब्बल 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम त्यांनी गोळा केली. धक्कादायक बाब म्हणजे फसवणूक झालेल्यांमध्ये अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे ईडीच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

ईडीने पुण्यातील दोन आणि बारामतीतील तीन ठिकाणी एकाचवेळी छापे टाकत महत्त्वाचे दस्तऐवज आणि डिजिटल पुरावे जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.बारामती डेअरी प्रायव्हेट लिमिटेडने या प्रकरणी आनंद सतीश लोखंडे आणि विद्या सतीश लोखंडे (दोघेही जलोची, तालुका बारामती) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. कंपनीची 10 कोटी 21 लाखांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे.

       

दरम्यान पैशांचे व्यवहार, बँक खात्यांतून झालेले व्यवहार आणि गुंतवणूकदारांकडून जमा केलेली रक्कम तपासण्यासाठी ईडीने मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे हस्तगत केली आहेत.सध्या ईडी या दाम्पत्याने गुंतवणूकदारांकडून घेतलेली रक्कम कोठे वळवली, किती जणांची फसवणूक झाली आणि या व्यवहारात आणखी कोणी सहभागी आहे का याबाबत सखोल तपास करत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!