आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया ! बनमीत नरुलाच्या हल्दवानी घरातून ईडीने २६८ बिटकॉइन्स जप्त केले !!
हल्दवानी : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया बनमीत नरुलाच्या हल्दवानी घरातून ईडीने २६८ बिटकॉइन्स जप्त केले आहेत. भारतीय रुपयांमध्ये त्यांचीकिंमत सुमारे १३० कोटी रुपये आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, बनमीत आणि त्याच्या भावाने याचा वापर डार्क वेबद्वारे ड्रग्ज खरेदी-विक्री करण्यासाठी केला होता.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नुकतेच सांगितले की, त्यांनी १३० कोटी रुपयांहून अधिक किमतीची क्रिप्टोकरन्सी जप्त केली आहे. आणि अमेरिकन अधिका-यांच्या विनंतीवरून सुरू केलेल्या ड्रग्सच्या तस्करीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा भाग म्हणून उत्तराखंडमधील एका व्यक्तीला अटक केली आहे. परिसराची झडती घेतल्यानंतर आरोपीला २७ एप्रिल रोजी नैनितालमधील हल्द्वानी येथून ताब्यात घेण्यात आले होते. केंद्रीय तपास यंत्रणेने सांगितले की, आरोपी डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकायचे. बहुतेक युरोपियन देशांमध्ये त्यांचे ग्राहक असायचे. अमेरिकन अधिका-यांकडून मिळालेल्या विनंतीच्या आधारे ही चौकशी सुरू करण्यात आली.
परविंदर सिंग आणि त्याचा भाऊ बनमीत सिंग आणि इतर काही जण सिंग डीटीओ नावाची आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीची रिंग चालवत असल्याचा आरोप आहे. त्यांनी क्रिप्टोकरन्सी व्यवहारांद्वारे डार्क वेब मार्केटमध्ये विकून पैसे उभे केले. आरोपींनी सिल्क रोड 1, अल्फा बे आणि हंसा सारख्या डार्क वेब मार्केट्सवर लिस्टन नावाचा वापर केला होता.
ईडीला लिस्टनच्या नावाशी जोडलेले बिटकॉइन्स मिळाले जे विविध देशांमध्ये अंमली पदार्थांच्या विक्रीतून गुन्ह्यातून मिळालेले पैसे होते. एजन्सीने सांगितले की, अमेरिकन अधिका-यांनी हजारो कोटी रुपयांची बिटकॉइन्स आधीच जप्त केली आहेत. अलीकडेच, उत्तराखंडमध्ये एलएसडीची आतापर्यंतची सर्वांत मोठी खेप डेहराडून पोलिसांनी पकडली होती. तस्कर डार्क वेबच्या माध्यमातून एलएसडी मागवत असल्याचेही समोर आले आहे.