मोठी बातमी! अनिल अंबानींच्या विविध ठिकाणांवर ईडीची छापेमारी, अधिकारीही रडारवर…

नवी दिल्ली : जगातील श्रीमंतांच्या यादीत समावेश असलेले मुकेश अंबानी यांचे बंधूचे चेअरमन अनिल अंबानी यांच्या मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सचे चेअरमन अनिल अंबानी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

ईडीकडून देशभरात तब्बल ५० ठिकाणी ही छापेमारी सुरू असून, यात अनिल अंबानी यांच्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारीही तपासाच्या रडारवर आहेत. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार करण्यात आली आहे.
नॅशनल हाऊसिंग बँक, सेबी, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ऑथोरिटी, तसेच बँक ऑफ बडोदा आणि सीबीआयच्या दोन FIR च्या आधारे ही छापेमारी करण्यात आल्याचं सूत्रांकडून समजते. विशेषतः रिलायन्स होम फायनान्स लि. या कंपनीशी संबंधित व्यवहार आणि मालमत्तांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.

ईडीने अनिल अंबानींच्या कार्यालयांसह त्यांच्या कंपन्यांशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवरही छापे टाकले आहेत. यामध्ये महत्त्वाचे आर्थिक दस्तऐवज, व्यवहार नोंदी, कॉन्ट्रॅक्ट्स व बँक व्यवहारांची झाडाझडती सुरू आहे. काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले असून, काहींना ताब्यात घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती आहे.
तीन हजार कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणात येस बँकेच्या अधिकाऱ्यांना लाच देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये बँकेचे प्रमोटरही होते, अशी माहिती अधिकाऱ्यांच्या तपासात समोर आली आहे. परिणामी येस बँकेच्या कर्ज देण्याच्या प्रक्रियेत गंभीर चुका आढळून आल्या आहेत.
कर्जाच्या कागदपत्रावर नंतरच्या तारखा आहेत. व्यवस्थित तपास करण्यात आलेला नाही आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कंपनीला कर्ज देण्यात आलं. कर्जाच्या अटींचं उल्लंघन, कर्ज मंजुरीच्या आधी किंवा त्याच दिवशी पैसे दिले गेले, अशी अनेक प्रकरणं ईडीला आढळून आली आहेत.