सावधान! उद्या १२ फेब्रुवारीला भारत बंद; काय सुरू आणि काय बंद राहणार? घराबाहेर पडण्यापूर्वी हे नक्की वाचा…


नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात उद्या (गुरुवार १२ फेब्रुवारी) रोजी देशभरातील प्रमुख कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. या संपाला शेतकरी संघटनांनीही पाठिंबा दिल्याने देशभरात मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या नव्या कामगार कायद्यांविरोधात हा संप पुकारण्यात आला असून सुमारे ३० कोटींपेक्षा अधिक कामगार सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शेतकरी संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने देशभरात मोठा परिणाम जाणवू शकतो.

त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी परिस्थितीची माहिती घेणे आवश्यक ठरणार आहे. कामगार संघटनांच्या मते, केंद्र सरकारने लागू केलेल्या चार नव्या कामगार संहितांमुळे कामगारांच्या नोकरीची सुरक्षा धोक्यात आली आहे.

मालकांना कर्मचाऱ्यांना सहज कामावरून काढण्याची मुभा मिळते, तसेच कामगारांच्या हक्कांचे संरक्षण कमी होते, असा आरोप संघटनांचा आहे. या धोरणांच्या निषेधार्थ CITU, AITUC, INTUC, HMS, AICCTU, LPF आणि UTUCसह १० केंद्रीय कामगार संघटनांनी एकत्र येत हा देशव्यापी संप पुकारला आहे.

या भारत बंदमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता आहे. अनेक शहरांतील मुख्य बाजारपेठा आणि दुकाने बंद राहू शकतात.

काही राज्यांत सरकारी कर्मचारी संपात सहभागी झाल्यास सरकारी कार्यालयांचे कामकाजही ठप्प होण्याची शक्यता आहे. रस्ते रोको आंदोलनांमुळे बससेवा आणि सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. खबरदारीचा उपाय म्हणून काही ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयेही बंद ठेवली जाऊ शकतात.

अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतील. रुग्णालये, रुग्णवाहिका आणि औषध दुकाने नियमितपणे कार्यरत असतील. विमानसेवा सुरू राहणार असल्या तरी विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी वाहतुकीची अडचण येऊ शकते. बँका बंद असल्या तरी एटीएम सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बहुतांश खासगी कार्यालये उघडी राहतील, मात्र कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, १२ फेब्रुवारीला घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या भागातील स्थानिक परिस्थितीची खात्री करून घ्यावी. बँकेची किंवा सरकारी कामे शक्य असल्यास आधीच पूर्ण करून ठेवावीत. अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहिती आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!