नवीन वर्षात पुणेकरांना मिळणार खास गिफ्ट! शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर धावणार ई-डबल डेकर बस, जाणून घ्या संपूर्ण माहिती..

पुणे : पुणे शहरातील नागरिकांसाठी नव्या वर्षात दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. तसेच २०२६ च्या सुरुवातीलाच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतुकीत मोठा बदल पाहायला मिळणार आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाने शहरातील प्रवाशांसाठी अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक ई-डबल डेकर बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दिशेने पीएमपीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीएमपीकडून एकूण २५ इलेक्ट्रिक डबल डेकर बस खरेदी करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला असून, यासाठी निविदा प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. या डबल डेकर इलेक्ट्रिक बससाठी गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. पीएमपीच्या संचालक मंडळाने यापूर्वीच या बस खरेदीस मान्यता दिली होती.

त्यानंतर सप्टेंबर महिन्यात हिंजवडी, भोसरी, कोरेगाव पार्क आणि विमाननगर या प्रमुख भागांतील रस्त्यांवर दहा दिवसांची प्रात्यक्षिक चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीदरम्यान बसची कामगिरी, प्रवासी क्षमता, वळणक्षमता तसेच इलेक्ट्रिक बॅटरीची कार्यक्षमता तपासण्यात आली.

बॅटरी तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यांची विशेष समिती नेमण्यात आली होती. समितीचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर अखेर २५ ई-डबल डेकर बस खरेदी करण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे.
प्राथमिक टप्प्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काही अत्यंत गर्दीच्या मार्गांवर या ई-डबल डेकर बस सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये हिंजवडी फेज ३ वर्तुळ मार्ग, रामवाडी मेट्रो स्टेशन ते खराडी, मगरपट्टा सिटी ते कल्याणीनगर मेट्रो स्टेशन, पुणे स्टेशन ते लोहगाव विमानतळ, देहू ते आळंदी आणि चिंचवड ते हिंजवडी या मार्गांचा समावेश आहे.
