राज्यात तीन दिवसांसाठी ड्राय-डे, कोण-कोणत्या शहरांमध्ये मद्यविक्री बंद?

पुणे : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या २ डिसेंबर रोजी राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबरला मतमोजणी आहे. त्यामुळे उद्या म्हणजेच १ डिसेंबरपासून तीन दिवसांसाठी ड्राय डे असणार आहे. ड्राय डे असल्यामुळे मद्यप्रेमींना हे तीन दिवस मद्य खरेदी करता येणार नाही. महाराष्ट्रात १ ते ३ डिसेंबर दरम्यान तीन दिवस ड्राय डे पाळला जाणार आहे. मतदान आणि मतमोजणी दरम्यान प्रभावित महानगरपालिका क्षेत्रातील दारूची दुकाने, बार, वाइन शॉप आणि बिअर शॉप बंद राहणार आहेत.

राज्यात स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.निवडणूक असलेल्या जिल्ह्यातील संबंधित नगरपरिषदा/नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी/ विदेशी किरकोळ मद्य विक्री व माडी विक्री अनुज्ञप्ती), बार अँड रेस्टॉरंट, वाईन शॉप, बिअर शॉपी १, २ डिसेंबर आणि ३ डिसेंबर २०२५ रोजी या तीन दिवशी बंद राहतील. या दिवशी मद्य विक्री बंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर काही जिल्ह्यात मतमोजणीच्या दिवशी (३ डिसेंबर) सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मद्यविक्री बंद राहिल. त्यानंतर मात्र काही जिल्ह्यांमध्ये मद्यविक्री सुरू होणार आहे. तर ज्या ठिकाणी निवडणुका रद्द झाल्या आहेत, त्या ठिकाणी मद्यविक्री चालू असणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. नागरिकांना मतदान करता यावे, मतदान प्रक्रियेत लोकांचा सहभाग वाढला पाहिजे, यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला. २ डिसेंबरला पगारी सुट्टी मिळणार आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील विविध अस्थापने, व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी सरकारने जाहीर केली आहे.

ज्या जिल्ह्यांमध्ये २ डिसेंबर म्हणजे मंगळवारी मतदान होणार आहे. त्या जिल्ह्यांतील कर्मचारी, अधिकारी आणि कामगार या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पगारी सुट्टी देण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ मधील तरतुदीनुसार मतदानाच्या दिवशी मतदारांना पगारी सुट्टी देणं बंधनकारक आहे. ही सुट्टीची अट त्या सर्व कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी लागू असणार आहे.
