मद्यधुंद महिलेचा विमानात धिंगाणा, क्रूला मारहाण करून स्वत:च्या अंगावरील कपडे उतरवुन विमानात गोंधळ…!

नवी दिल्ली : विमानात महिलेवर लघुशंका केल्याच्या लाजिरवाण्या कृत्यानंतर आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. आता एका मद्यधुंद महिला प्रवाशाने स्वतःचे कपडे उतरवून, केबिन क्रूवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुंबईला जाणाऱ्या विस्तारा एअरलाइनच्या (UK 256) फ्लाइटमध्ये ही घटना घडली आहे. ही महिला प्रवासी इटलीची असून तिचे नाव पाओला पेरुचियो आहे. आपल्या सीटवरून उठली आणि बिझनेस क्लासच्या सीटवर बसू लागली, तेव्हा क्रू मेंबर्सनी त्याला आक्षेप घेतला आणि तिला सीटवरून उठण्यास सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या त्या महिलेने एका क्रू मेंबरच्या तोंडावर ठोसा मारला. त्याचवेळी अन्य क्रू मेंबरने रोखण्याचा प्रयत्न केला असता ती महिला त्या मेंबरवर थुंकली. नंतर, तिने आपल्या अंगावरील कपडे काढले आणि विमानात इकडे तिकडे फिरू लागली. या मद्यधुंद महिलेने क्रू मेंबर्सना शिवीगाळही केली.
या महिलेने आपले कपडे उतरवल्यानंतर विमानातील गोंधळ वाढला. कॅप्टनच्या सूचनेनंतर तिला पकडून कपडे घालण्यात आले आणि नंतर विमान उतरेपर्यंत सीटवर बांधून ठेवले. मुंबई पोलिसांनी या महिलेचा पासपोर्ट जप्त केला असून तिला अंधेरी न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपपत्र दाखल केले.

एअरलाइन कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विमानात गोंधळ घालणे आणि क्रू मेंबरला मारहाण करणे, याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली. तसेच, तिला 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.