मद्यधुंद डंपर चालक, ९ जणांना चिरडलं, तिघांचा मृत्यू, आता पुणे अपघात प्रकरणी भयंकर माहिती आली समोर…

पुणे : पुणे जिल्ह्यात मध्यरात्री एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीवरून कामासाठी पुण्यात आलेल्या ९ जणांना पुण्यात वाघोली केसनंद परिसरात डंपरने चिरडलं. यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत सध्या पोलीस तपास करत असून या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे.

पुण्यात काम शोधण्यासाठी आलेल्या या कामगारांनी फुटपाथवर आसरा घेतला होता. पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने ९ जणांना चिरडले. यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. आता पोलिसांनी नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, डम्पर चालक वाघोली रस्त्यावर आले असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात घडला. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. मात्र डम्पर चालक दारुच्या नशेत होता, असे काहींनी सांगितले आहे. वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यावर चित्र स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

या घटनेतील मृतांमध्ये एक आणि दोन वर्षांच्या चिमुकल्यांचा समावेश आहे. वैभवी रितेश पवार (वय.१), वैभव रितेश पवार (वय.२), रीनेश नितेश पवार (वय.३०) अशी मृतांची नावे आहेत. तर यात जानकी दिनेश पवार (वय. २१), रिनिशा विनोद पवार (वय.१८), रोशन शशादू भोसले (वय 9), नगेश निवृत्ती पवार (वय.२७), दर्शन संजय वैराळ (वय.१८), आलिशा विनोद पवार (वय.४७) जखमी झाले आहेत.
गजानन शंकर तोट्रे (वय २६ रा. नांदेड असे डंपर चालकाचे नाव आहे. वाघोलीतील केसनंद फाट्यावर रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. त्यामुळे त्याने भरधाव डंपर फूटपाथवर चढून झोपलेल्या लोकांच्या अंगावर घातली. हे सर्व कामगार वर्ग आहे.
दरम्यान, आरोपी चालक २६ वर्षांचा असून मूळ नांदेडचा रहिवासी आहे. तो अनेक दिवसांपासून हे वाहन चालवत होता. पुणे शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहनांना बंदी आहे. मात्र हा अपघात रात्री एक वाजताच्या सुमारास घडला आहे. पुणे शहराच्या बाहेरील भागात घडला. आता याबाबत वाहतूक पोलिसांनी लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.