Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवस पुणे दौऱ्यावर, विविध संस्थांना देणार भेटी..
Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून म्हणजे (ता.२९) बुधवार तीन दिवस पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात राष्ट्रपती विविध लष्करी संस्था, कृषी विद्यापीठाला भेट देणार आहेत. दुपारच्या सुमारास लोहगाव विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे.
त्यांच्या आगमनाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, दक्षिण मुख्यालयाचे अधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पुण्याहून राष्ट्रपती नागपूरकडे रवाना होणार आहेत. Droupadi Murmu
तसेच राष्ट्रपतींच्या पुणे दौऱ्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि लष्करी वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी), लोणावळा येथील नौदलाच्या आयएनएस शिवाजी अशा लष्कराच्या संस्थांमधील कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी होणार आहेत.
त्यानंतर लोणावळ्यातील नौदलाच्या आयएनएस शिवाजी संस्थेला त्या भेट देणार आहेत. तसेच लोणावळ्यातील कैवल्यधाम येथील योगसंस्थेत जाणार आहेत. त्यानंतर थेट एनडीए येथे त्यांचा मुक्काम असणार आहे. गुरुवारी (३० नोव्हेंबर) ‘एनडीए’च्या १४५ व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलन सोहळ्याला त्यांची उपस्थिती असणार असून, या वेळी स्नातकांच्या वतीने त्या मानवंदना स्वीकारणार आहेत.
त्यानंतर नगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाला भेट देऊन पुण्यातील राजभवन येथे मुक्कामी येणार आहेत. १ डिसेंबर रोजी राष्ट्रपती मुर्मू राजभवन येथून वानवडी येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातील (एएफएमसी) कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यानंतर दुपारी लोहगाव विमानतळावरून नागपूरकडे प्रयाण करणार आहेत.