वाहनचालकांना 15 ऑगस्टपासून फास्टॅगचा वार्षिक पास मिळणार, होणार मोठा फायदा, ‘असा’ काढा पास..

मुंबई : वाहनचालकांसाठी FASTag वार्षिक पास सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, ही सुविधा 15 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहे. यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या उपक्रमामुळे वाहनचालकांना वारंवार टोलसाठी फास्टॅग रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. यामुळे ही सुविधा फायदेशीर ठरणार आहे. असे असले तरी व्यावसायिक वाहनांवर हा पास लागू होणार नाही.

यामुळे वेळेची बचत, खर्चात घट, आणि टोल प्लाझांवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. जे लोक लांबचा प्रवास करतात त्यांच्यासाठी ही सुविधा अधिक फायदेशीर ठरू शकते. यामुळे आता एकदाच रिचार्ज, वर्षभर टोलपासून मुक्ती मिळणार आहे. NHAI ने फास्टॅगच्या नियमांमध्ये बदल करत खासगी कार, जीप, व्हॅनसारख्या खासगी गाड्यांसाठी वार्षिक पास देण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्याच्या परिस्थितीत टोल नाक्यावर वाहनाच्या वजनानुसार वेगवेगळं शुल्क घेतलं जातं. आता 200 टोल क्रॉस करण्यासाठी जवळपास 10000 रुपये लागू शकतात. पण आता एक टोल क्रॉस करण्यासाठी 15 रुपये शुल्क आकारलं जाईल. त्यामुळे केवळ 3000 रुपयांमध्ये काम होईल. हा वार्षिक पास फक्त NHAI आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (MoRTH) च्या राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर लागू असेल.

यामध्ये दिल्ली–मुंबई एक्सप्रेसवे, मुंबई–रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग, मुंबई–नाशिक महामार्ग, मुंबई–सुरत मार्ग याठिकाणी हा पास लागू असणार आहे. राज्य महामार्ग किंवा महापालिकेच्या टोल मार्गांवर म्हणजेच मुंबई–पुणे एक्सप्रेसवे, मुंबई–नागपूर समृद्धी महामार्ग, अटल सेतूवर हा पास लागू होणार नाही. याठिकाणी फास्टॅग टोल शुल्क आकारले जाईल.
फास्टॅग वार्षिक पास काढण्यासाठी तुम्हाला राजमार्ग यात्रा अॅप (Rajmarg Yatra App) किंवा NHAI/MoRTH च्या अधिकृत वेबसाइटवर वाहन क्रमांक आणि फास्टॅग आयडीने लॉगिन करावा लागणार आहे. याठिकाणी 3000 रुपयांचे ऑनलाईन पेमेंट करावे लागेल. नंतर पास तुमच्या FASTag खात्याशी लिंक होईल आणि 15 ऑगस्ट रोजी SMS द्वारे माहिती मिळेल.