गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ करण्याचे स्वप्न! उपमुख्यमंत्र्यांच्या पुणे जिल्ह्यातच डीजेला शहरी व ग्रामीण भागात दोन नियमांच्या पायवाटा…

जयदिप जाधव

उरुळीकांचन : राज्यात प्रथमच यंदाचा गणेशउत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या गणेशोत्सव राज्य महोत्सव साजरा करण्याच्या निर्णयाने सर्वस्तरांतून स्वागत होत असले तरी पुणे जिल्ह्यात गणेश उत्सव साजरा करण्याची कसलीच रुपरेषा नसल्याचा सवाल उपस्थित होत असून उत्सव साजरा करताना पुणे व पिंपरी चिंचवड शहरांत डीजेमुक्त सण तर ग्रामीण भागात डीजे वापराची कमाल मर्यादा ठरल्याने ग्रामीण भागात पुन्हा डीजेचा दणदणाट घडणार असून पालकमंत्री म्हणून अजित पवार आपला जिल्ह्याला समान न्यायात मोजणार का ? ग्रामीण भागाला डीजेची नियमबाह्य परवानगी अशी संदिग्ध भूमिका पुणे ग्रामीण पोलिसांच्या भूमिकेने दिसत आहे.

गणेशोत्सव काळात पुणे शहराप्रमाणे ग्रामीण भागातील नागरीकांनाही मोठ्या प्रमाणात डीजेचा त्रास सहन करावा लागला आहे. ग्रामीण भागात डीजेचा मोठा दणदणाट असून डीजेचा वापर करताना सार्वजनिक मंडळे अमर्यादपणे डीजेचा वापर करीत आहे. उच्च न्यायालयाने डीजे वापराचे दिलेले निर्बंध ग्रामीण पोलिस मात्र पाळीत नसल्याचे वास्तविक चित्र ग्रामीण भागात आहे.यंदाही पोलिसांच्या संभ्रमजनक निर्देश दिल्याने डीजेचा वापर होणार असल्याचे उघड झाले आहे. ग्रामीण भागातील पोलिस गणेशोत्सव तयारीच्या आढावा बैठकीत मंडळांना मर्यादीत आवाजात डीजे वापराची सूचना केल्याने ग्रामीण भागात डीजेचा वापर होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने पुणे ग्रामीण पोलिसांच्या या संभ्रमित भूमिकेने नागरीक चिंतेत अडकले आहे.

गत वर्षाच्या गणेशोत्सवात डीजेच्या वापराने हदय विकार, बधीरपणा, रक्तदाब तसेच डीजेच्या एलएडी लाईट वापराने अंध पणा वाढल्याने विकार समोर आले आहे.अशावेळी ग्रामीण भागात डीजेला मर्यादीत स्वरूपात (६५ डेसिबल्स) आवाज परवानगी असली तरी डीजेचा अमर्याद दणदणाट अटळ असल्याने पुणे जिल्ह्यातील ग्रामीणला एक व शहरीला वेगळा न्याय यामुळे पुणे जिल्ह्यातील हा विरोधाभास ग्रामीणच्या मुळावर का असा प्रश्न आहे.
पुणे जिल्ह्यातील डीजेच्या परवानगीने ग्रामीण भागातील उत्सवाला मोठ्या प्रमाणात उथळपणा वाढणार असून उत्सव सुसंस्कृतपणे वातावरणात पार पाडावा या प्रयत्नांना छेद मिळणार आहे. दहा दिवसांच्या उत्सवाला ज्येष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन कराला लागणार असून उत्सवात अवैद्य धंद्यांना मोठया प्रमाणात मिळणाऱ्या या प्रोत्साहाने पुणे जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातील विभिन्न नियमांनी शासनाचा राज्य महोत्सव म्हणून उत्सव साजरा करण्याचा हेतू साध्य होईल काय असा प्रश्न आहे.
दरम्यान ग्रामीण भागातील डीजेच्या वापरावरील संभ्रम परिस्थितीवर ग्रामीण पोलिस अधिक्षक संदिपसिंह पाटिल यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
हवेलीत कुठे दणदणाट कुठे शांतता…
हवेली तालुका हा पुणे शहर व ग्रामीण अधिक्षक कार्यालय या विभागांत विभागला आहे. त्यामुळे हवेली तालुक्यातील एका गावात डीजेची शांतता व वेशीवर दुसऱ्या गावांत मात्र दणदणाट हे गमतीचे चित्र पहायला मिळणार आहे. त्यामुळे पोलिस दलांत उत्सवाला नियंत्रण घालताना जिल्हाधिकारी अथवा पालकमंत्री लक्ष पुरविणार असा प्रश्न आहे.
